पितळ उघडे पडू नये यासाठी चीनने ‘डब्ल्यूएचए’मधील तैवानचा सहभाग रोखला

वॉशिंग्टन/तैपेई – जागतिक आरोग्य संघटनेची ‘वर्ल्ड हेल्थ असेंब्ली’ (डब्ल्यूएचए) सुरू झाली आहे. यात तैवानला सहभागी होण्याची संधी मिळू नये, यासाठी चीनने आपला प्रभाव वापरला. याचे कारण तैवानने 2019 सालच्या डिसेंबर महिन्यातच चीनमध्ये कोरोनाच्या साथीपासून जगाला सावध करण्याचा प्रयत्न केला होता. डब्ल्यूएचएमध्ये तैवानने हा मुद्दा उपस्थित केला तर चीनने कोरोनाची माहिती दडपली व त्याला जागतिक आरोग्य संघटनेने साथ दिली हे जगजाहीर झाले असते. म्हणूनच आपले पितळ उघडे पडू नये, यासाठी चीनने तैवानला ही संधी नाकारली, असे आरोप होत आहेत.

‘डब्ल्यूएचए’‘डब्ल्यूएचए’ची 74 वी परिषद सुरू आहे. यात 194 सदस्यदेश सहभागी झाले आहेत. कोरोनाच्या साथीचा सामना करीत असताना, या साथीच्या नव्या लाटेला तोंड देण्याची तयारी करण्यावर या परिषदेत विचारविनिमय सुरू आहे. मात्र या परिषदेच्या काही दिवस आधी, चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळा हेच कोरोनाच्या विषाणूचे उगमस्थान आहे, या आरोपाला दुजोरा देणार्‍या बातम्या येऊ लागल्या आहेत. चिनी संशोधिका डॉ. ली-मेंग यान यांनी तसे पुरावे आपल्याकडे असल्याचे जाहीर केले. या प्रयोगशाळेत काम करणारे सुमारे तीन चिनी संशोधक या साथीने 2019 सालच्या नोव्हेंबर महिन्यातच आजारी पडले होते. पण चीनने ही सारी माहिती दडपली, असा दावा पाश्‍चिमात्य वर्तमानपत्रे करीत आहेत.

यामुळे कोरोनाची साथ म्हणजे चीनने छेडलेले जैविक युद्धच असल्याच्या आरोपाला बळ मिळाले आहे. यामुळे चीनबाबतचा संशय वाढत असतानाच, डब्ल्यूएचएमध्ये तैवानला संधी नाकारून चीनने आपल्याबाबतचा संशय अधिकच वाढविल्याचे दिसते. 2019 सालच्या डिसेंबर महिन्यातच तैवानने चीनमध्ये सुरू झालेल्या या साथीपासून जगाला सावध केले होते. जागतिक आरोग्य परिषदेने याकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही तैवानने केले. पण त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. हा मुद्दा उपस्थित करून तैवानने डब्ल्यूएचएमध्ये चीनची कोंडी केली असती, या भीतीने चीनने आपला प्रभाव वापरून तैवानला रोखल्याची चर्चा सुरू झाली आहे.

तैवाननेही आपल्याला सदर परिषदेत सहभागी होण्याची संधी चीनमुळे नाकारण्यात आली, असा आरोप केला. चीनच्या प्रभावाखाली येऊन जागतिक आरोग्य संघटनेने काम करू नये व या डब्ल्यूएचएमध्ये तैवानला सहभागी होण्याची संधी द्यावी, असे आवाहन तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी केले. कम्युनिस्ट चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेने मिळून तैवानला या परिषदेत सहभागी होऊ दिले नाही, असा ठपका संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी ठेवला. गटबाजी करून आपले हेतू साधण्यात चीनला काही गैर वाटत नाही, या देशाला कोरोनाच्या साथीमुळे आलेल्या संकटाचीही फिकीर नाही, अशी जळजळीत टीका हॅले यांनी केली आहे.

leave a reply