पाकिस्तान तालिबानच्या सहाय्याने ‘डेथ स्क्वाड’ चालवित आहे

-तालिबानच्या माजी प्रवक्त्याचा दावा

इस्लामाबाद – पाकिस्तानचे सरकार आणि लष्कर दहशतवाद्यांच्या सहाय्याने विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी ‘डेथ स्क्वाड’ चालवित असल्याचे उघड झाले आहे. तालिबानचा माजी प्रवक्ता एहसानुल्लाह एहसान याने प्रसिद्ध केलेल्या नव्या व्हिडिओमध्ये हा आरोप केला. अशा विरोधकांची हिटलिस्ट बनवून पाकिस्तानी लष्कराने आपल्याला दिली होती, अशी माहिती एहसानने दिली. यामुळे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांमध्ये असलेले साटेलोटे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

‘डेथ स्क्वाड’

एहसानुल्लाह एहसान याने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सुमारे बारा मिनिटांचा ऑडिओ पोस्ट केला. यामध्ये पाकिस्तानच्या लष्कराबरोबरचे संबंध, त्यांनी दिलेली हिट-लिस्ट आणि पुढे झालेले पलायन याची माहिती एहसानने दिली. ‘पाकिस्तान सरकार आणि लष्कराने विरोधकांना संपविण्यासाठी हिट-लिस्ट बनविली होती. यामध्ये खैबर-पख्तूनवाला प्रांतातील नेते, अधिकारी तसेच पत्रकार यांचा समावेश होता. या डेथ-स्क्वाड्चे नेतृत्व आपल्याकडे दिले होते’, अशी माहिती एहसानने दिली.

यासाठी पाकिस्तानी लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी आपल्या संपर्कात होते, असेही एहसान याने यात सांगितले. पण दहशतवाद्याचे आयुष्य सोडून शांतीने जीवन जगायचे होते, म्हणून या डेथ स्क्वाड’चे नेतृत्त्व करण्याचे नाकारले, असा खुलासा एहसानने केला. पुढे पाकिस्तानी लष्कराबरोबर झालेल्या करारानुसार, कोणताही आरोप न ठेवता आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात आले. त्याचबरोबर पाकिस्तानी लष्कराकडून आर्थिक सहाय्य देखील मिळत गेले, असा दावा एहसान याने यात केला आहे. पुढच्या काही दिवसातच या नजरकैदेतून आपली सुटका झाल्याचे तालिबानच्या माजी प्रवक्त्याने सांगितले.

सध्या एहसान कुठे आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पाकिस्तानी लष्कराने त्याला तुर्कीत लपविल्याचा दावा पाकिस्तानातील काही माध्यमे करीत आहेत. तर पाकिस्तानी लष्कर आपल्यावरील हे आरोप फेटाळत आहे. दहशतवादविरोधी कारवाई दरम्यान एहसान आपल्या कैदेतून फरार झाल्याचा दावा पाकिस्तानी लष्कर करीत आहे. त्यामुळे तालिबानच्या माजी कमांडरने केलेले दावे निराधार असल्याचे पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पाकिस्तानचे सरकार आणि लष्कर आपल्या विरोधकांना संपवित असल्याचा किंवा त्यांना गायब करीत असल्याचा आरोप सध्या जोर पकडू लागला आहे. गेल्या महिन्यात दोन पाकिस्तानी पत्रकारांवरील कारवाईने ही टीका वाढली आहे. तर पाकिस्तानचे लष्कर व गुप्तचर यंत्रणा “आयएसआय”, सिंध, बलोचिस्तान आणि खैबर-पख्तूनवालातील चळवळ दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचाही आरोप केला जातो. गेल्या काही दिवसांपासून या प्रांतातील जनताही पाकिस्तानी यंत्रणेच्या विरोधात रस्त्यावर उतरुन निदर्शने करीत आहे.

leave a reply