पाच राज्यांमधील निवडणूकांचा फायदा घेऊन पाकिस्तानच्या आयएसआयचा भारतात घातपात माजविण्याचा कट

नवी दिल्ली – पाकिस्तानने नुकतीच राष्ट्रीय सुरक्षाविषयक धोरणाची घोषणा केली होती. यात भारताबरोबर संबंध सुधारण्याचे दावे करण्यात आले होते. पण हे धोरण म्हणजे धुळफेक असल्याची बाब समोर आली आहे. भारताच्या पाच राज्यांमध्ये १० फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या निवडणुकीचा फायदा घेऊन पाकिस्तानची आयएसआय घातपात माजविण्याच्या तयारीत आहे. यासाठी पंजाबमधील विघटनवाद्यांना हाताशी धरण्याची तयारी पाकिस्तानच्या या कुख्यात गुप्तचर संघटनेने केल्याची माहिती गुप्तचरांनी दिल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

पाच राज्यांमधील निवडणूकांचा फायदा घेऊन पाकिस्तानच्या आयएसआयचा भारतात घातपात माजविण्याचा कटप्रजासत्ताक दिनाच्या आधी राजधानी नवी दिल्लीतील राजपथपासून अवघ्या काही किलोमीटर इतक्या अंतरावर असलेल्या फिरोझपूर येथे आयईडी स्फोटके सापडली होती. घातपात माजविण्याच्या या कारस्थानामागे पाकिस्तानचा हात असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी नाकारलेली नाही. त्याचवेळी पंजाबमधील विघटनवाद्यांना आयएसआयकडून चिथावणी दिली जात असल्याचे समोर येत आहे. १० फेब्रुवारीपासून पंजाबसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक संपन्न होणार आहे. याचा फायदा घेऊन आयएसआय घातपात माजविण्यासाठी हालचाली करीत असल्याचे गुप्तचर विभागातील सूत्रांनी म्हटले आहे.

माध्यमांमध्ये हे दावे प्रसिद्ध झाले असून यामुळे पाकिस्तानचा आणखी एक भयंकर कट समोर आला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या सरकारकडून भारताबरोबर शांतता प्रस्थापित करण्याची तयारी म्हणजे दिशाभूल करण्याचा डाव असल्याचे दिसते. पंजाबमधील निवडणुकीच्या धामधुमीत प्रचारयात्रा, रॅलीज् याचा फायदा घेण्याचा प्रयत्न आयएसआय करीत आहे. यासाठी विघटनवाद्यांबरोबर दहशतवादी संघटनांचा वापर करण्याची आयएसआयची योजना आहे. ‘लश्कर-ए-तोयबा’, ‘जैश-ए-मोहम्मद’, ‘इंडियन मुजाहिद्दीन’ व ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ या आपल्या दहशतवादी संघटनांना आयएसआयने त्यांचे पंजाब व उत्तर प्रदेशातील त्यांचे स्लिपर सेल सक्रीय करण्याची सूचना केली आहे.

पंजाबच्या सुरक्षा दलातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने ही माहिती दिल्याचे सांगितले जाते. मात्र देशाच्या सुरक्षा यंत्रणा हे घातपात रोखण्यासाठी सज्ज आहेत. काही महिन्यांपूर्वी भारताने ‘सीमा सुरक्षा दला’चे कार्यक्षेत्र सीमेपासून ५० किलोमीटरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे घातपाती कारवाया व दहशतवाद्यांना रोखणे सोपे जाईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे.

leave a reply