इराणमधील स्फोटांमुळे स्थानिकांमध्ये दहशत

स्फोटांमुळेतेहरान – पश्‍चिम इराणमध्ये गूढ स्फोट झाले. या स्फोटांमुळे प्रचंड तीव्रतेचे हादरे बसल्याचे स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे. पण इराणच्या यंत्रणांनी यामागे ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट असल्याचे म्हटले आहे. इराणी अधिकार्‍यांनी दिलेला हा खुलासा कुणालाही मान्य नाही, त्याची खिल्ली उडविली जात आहे.

इराणच्या पश्‍चिमेकडील तीन शहरे शनिवारी मध्यरात्री गूढ स्फोटांनी हादरली. असादाबाद, केरमानशाह आणि कामयारन शहरांमध्ये या स्फोटाचे दूरवर हादरे बसले. एकमेकांपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या या शहरांमध्ये झालेल्या स्फोटांनी नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. इराणी पत्रकार आणि स्थानिकांनी सोशल मीडियावर याची माहिती प्रसिद्ध केली.

काही दिवसांपूर्वी इराणच्या बुशहेर अणुप्रकल्पाच्या हवाईहद्दीत गूढ स्फोट झाला होता. त्यानंतरही जवळपासच्या स्थानिकांमध्ये या स्फोटाने भीती पसरली होती. पण नंतर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी हा हवाई सुरक्षा सरावाचा एक भाग असल्याचे जाहीर केल्यानंतर जनतेचा जीव भांड्यात पडला होता. इराणच्या लष्कराने आत्ताही असाच सराव केला का, याची माहिती घेण्याचे जनतेचे प्रयत्न सुरू होते. पण इराणच्या यंत्रणेने दिलेले कारण पटणारे नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, याआधी इराणच्या अणुप्रकल्प तसेच लष्करी ठिकाणांवर संशयास्पदरित्या स्फोट झाले आहेत. इराणने यासाठी इस्रायलला जबाबदार धरले होते. त्यामुळे आत्ता झालेल्या स्फोटांमागेही इस्रायल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सध्या तरी इराणच्या राजवटीने यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

leave a reply