अंतर्गत समस्येकडून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी पाकिस्तान ‘एलओसी’वर तणाव वाढविण्याच्या तयारीत

- भारतीय लष्कराच्या अधिकार्‍यांचा आरोप

श्रीनगर – आपल्या अंतर्गत समस्यांकडून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी पाकिस्तान काश्मीरच्या ‘एलओसी’वर तणाव वाढवू शकेल, असा ठपका भारताचे लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांनी ठेवला आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून (पीओके) घुसखोरी करण्यासाठी सुमारे २०० ते २५० दहशतवादी टपून बसले आहेत, याचा दाखला देऊन ले. जनरल राजू यांनी पाकिस्तानवर हा आरोप केल्याचे दिसते. गेल्या काही दिवसातील घडामोडी लक्षात घेता, पाकिस्तानने याची पूर्वतयारी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी २३ डिसेंबर रोजी पीओकेमधील नियंत्रण रेषेला भेट दिली होती. भारताने हल्ला चढविलाच, तर पाकिस्तान त्याला सडेतोड उत्तर देईल, असे दावे जनरल बाजवा यांनी यावेळी ठोकले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली. या वेळी पाकिस्तानची कुप्रसिद्ध गुप्तचर संघटना ‘आयएसआय’चे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद देखील उपस्थित होते. यावेळी पाकिस्तानच्या सुरक्षेशी निगडीत असलेल्या मुद्यांवर गंभीर चर्चा पार पडल्याचे सांगितले जाते.

भारत दहशतवादी हल्ल्याचे कारण पुढे करून पाकिस्तानवर आक्रमण करील, अशी चिंता या चर्चेत पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. अशा काळात पाकिस्तानचे सरकार आणि विरोधी पक्षामध्ये निर्माण झालेला विसंवाद घातक ठरू शकतो. त्यामुळे पाकिस्तानच्या सरकारने विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करावी, अशी सूचना लष्करप्रमुख बाजवा यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना केल्याच्या बातम्या येत आहेत. सध्या पाकिस्तानात विरोधी पक्षांची निदर्शने सुरू असून त्याला फार मोठा प्रतिसाद मिळत आहे. महागाई, बेकारी यांनी त्रस्त झालेली पाकिस्तानची जनता सरकारच्या विरोधात गेल्याचे जनतेच्या या प्रतिसादावरून उघड होत आहे.

आपण सरकार स्थापन करण्याच्या आधी पूर्वतयारी केली नव्हती, पहिले तीन महिने गोष्टी समजून घेण्यातच गेल्या, अशी कबुली पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकतीच दिली होती. यावर पाकिस्तानात गदारोळ माजला आहे. राजकीय प्रगल्भता व अनुभव नसलेल्या इम्रान खान यांना पाकिस्तानच्या लष्करानेच सत्तेवर आणल्याचा आरोप अधिकच तीव्र झाला आहे. याचा फटका इम्रान?खान यांच्या सरकारबरोबरच लष्करालाही बसला आहेत. त्यातच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ व इतर विरोधी पक्षनेते देखील इम्रान खान यांना सत्तेवर आणणारे पाकिस्तानचे लष्करच गुन्हेगार असल्याचा आरोप सातत्याने करीत आहेत.

अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या लष्करावरील दबाव वाढत चालला आहे. त्यामुळे भारत आपल्या देशावर हल्ला चढविण्याची तयारीत करीत असल्याचे दावे पाकिस्तानी लष्कराने सुरू केले आहेत. लष्करधार्जिणे पत्रकार व विश्‍लेषक यांनी ही बाब उचलून धरली असून अशा काळात विरोधी पक्ष सरकारविरोधात मोहीम राबवित असल्याचा कांगावा या सर्वांनी सुरू केलेला आहे. पाकिस्तानचे विरोधी पक्ष भारताशी हातमिळवणी करीत असल्याचा आरोप करून ते देशद्रोही असल्याची घणाघाती टीका सरकार तसेच लष्करधार्जिणे विश्‍लेषक करीत आहेत. मात्र हे आरोप म्हणजे विरोधी पक्षांकडून सुरू असलेले आंदोलन दडपण्याचा भाग असल्याचा प्रत्यारोप विरोधी पक्षनेते करीत आहेत.

अशा परिस्थितीत काश्मीरच्या एलओसीवरील तणाव वाढविणे व भारताच्या हल्ल्याचा बागुलबुवा उभा करणे, पाकिस्तानी लष्कराच्या हिताची बाब ठरते. या योजनेवर काम करणारे पाकिस्तानी लष्कर काश्मीरच्या एलओसीवर गोळीबार तसेच दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणत असल्याचे दिसते. भारतीय लष्कराच्या १५ कॉर्प्सचे प्रमुख ले. जनरल राजू यांनी केलेल्या दाव्यांमुळे या आरोपांना दुजोरा मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.

leave a reply