कोरोनाव्हायरसच्या संकटाची तीव्रता वाढल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान धोक्यात

इस्लामाबाद – चीन आणि इराण या दोन्ही शेजारी देशांमध्ये कोरोनाव्हायरसची साथ थैमान घालत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे आता मात्र धाबे दणाणले आहेत. पुढच्या काळात ही साथ पाकिस्तानात भयंकर उत्पात माजवू शकते ,अशी भिती पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे. मात्र इम्रान खान यांनी वेळीच पाकिस्तानात लॉकडाऊन केले असते तर पाकिस्तानची होणारी दुर्दशा निदान काही प्रमाणात टाळता आली असती, अशी जोरदार टीका सुरू झाली आहे व यामुळे इम्रान खान यांचे आसन अस्थिर बनले आहे.

पाकिस्तानात कोरोनाव्हायरसच्या साथीत ७२ बळी गेले असून रुग्णांची संख्या ४७७८ वर पोहोचली आहे. पुढच्या काळात पाकिस्तानातील ही रुग्णांची संख्या व त्यांच्‍या बळींची संख्या यांचा गुणाकार होईल, अशी भीती या देशातील पत्रकार व वैद्यकीय तज्ञ फार आधीपासून व्यक्त करीत आले आहेत. म्हणूनच पंतप्रधान इम्रान खान यांनी वेळीच देशात लॉकडाऊन करावा ,अशी मागणी या पत्रकार व तज्ञांनी केली होती. पण इम्रान खान यांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला होता. पाकिस्तान सारख्या गरीब देशात लॉकडाऊनमुळे उपासमार होईल, असे कारण इम्रान खान यांनी दिले होते.

चीन व इराण या पाकिस्तानच्या शेजारी देशांमध्ये कोरोनाव्हायरसचे हजारो बळी जात असताना देखील पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी या साथीबाबत पुरेसे गांभीर्य दाखविले नाही. यावर पाकिस्तानी माध्यमांनी जोरदार टीका केली होती. मात्र इम्रान खान यांनी या टीकेला उत्तर देताना लॉकडाऊन करणाऱ्या भारतासारख्या शेजारी देशावर शेरेबाजी केली आणि आपल्या निर्णयाचे समर्थन केले होते. पण आता मात्र हा फाजीलपणा इम्रान खान यांच्या अंगावर उलटल्याचे दिसू लागले आहे.

या साथीचा मुकाबला करण्यासाठी इम्रान खान यांनी निधी उभारण्याची घोषणा करून जनतेला यासाठी सहाय्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच या साथीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी घरातच रहा असे इम्रान खान यांनी आपल्या जनतेला विनवले आहे. तसेच पुढच्या काळात या साथीच्या रुग्णांची संख्या वाढली तर रुग्णांवर उपचार करण्यासाठी पाकिस्तानात पुरेशी हॉस्पिटल्स नाहीत, हे देखील इम्रान खान यांनी सांगून टाकले. जगातील श्रीमंत देश देखील या साथीसमोर हतबल झाले असून पाकिस्तानचे प्रयत्नही यासाठी समोर थिटे पडतील, अशा शब्दात आपल्या बेजबाबदारपणाची कबुली इम्रान खान यांनी देऊन टाकली.

खरे तर इम्रान खान आता कबुली देत असलेली ही बाब फार आधी लक्षात घेऊन पाकिस्तानात लॉकडाऊन करायला हवे होते, अशी जोरदार टीका सुरू झाली आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांची अकार्यक्षमता या देशाला भोवणार असून पुढच्या काळात आपली धडगत नसेल, असे पाकिस्तानचे पत्रकार उघडपणे जनतेला बजावू लागले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या लष्कराने सूत्रे हाती घेतली असून ही साथ रोखण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. इम्रान खान यांची सदोष धोरणे आणि कार्यपद्धती यावर पाकिस्तानचे लष्करही नाराज असल्याचे दावे केले जात आहेत.

पाकिस्तानी लष्कराची नाराजी पाहता पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांच्याकडे फार काळ उरलेला नाही ,असा दावा पाकिस्तानचे काही पत्रकार करीत आहेत. ज्याप्रमाणात पाकिस्तानात कोरोनाव्हायरस ची साथ थैमान घालू लागेल, त्याप्रमाणात इम्रान यांच्या विरोधात नाराजी वाढत जाईल व त्यांना राजीनामा द्यावा लागेल असे संकेत पाकिस्तानचे काही पत्रकार व माजी राजनैतिक अधिकारी देत आहेत. तसे झाले तर ते पाकिस्तानच्या भल्याचे ठरेल. कारण इम्रान खान यांनी त्यांच्या बेजबाबदारपणामुळे पाकिस्तानला फार मोठ्या संकटात ढकलले आहे व यातून बाहेर काढण्याची क्षमताही त्यांच्यापाशी नाही, अशी जळजळीत टीका या माजी राजनैतिक अधिकाऱ्यांनी केली आहे.

leave a reply