बोफोर्स तोफांचा मारा करून भारतीय लष्कराने पाकिस्तानी दहशतवाद्यांचे तळ उडविले

श्रीनगर – काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळील दहशतवाद्यांचे तळ त्यांची शस्त्रास्त्रे कोठारे आणि पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या उद्ध्वस्त करून भारताने पाकिस्तानची खोड मोडली आहे. याचे व्हिडिओ देखील भारतीय लष्कराने प्रसिद्ध केले असून त्यामुळे पाकिस्तानी लष्कराला आपली हानी झालीच नाही असा बचाव करण्याची संधी यावेळी मिळालेली नाही. म्हणूनच आपली नाचक्की टाळण्यासाठी पाकिस्तान भारतीय लष्कर आपल्या नागरी वस्त्यांना लक्ष्य करीत असल्याचा कांगावा करीत आहे.

सारे जग कोरोनाव्हायरसच्या संकटाचा मुकाबला करीत असताना पाकिस्तान मात्र आपला दहशतवादाचा मार्ग सोडायला तयार नाही. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील आपल्या दहशतवादी कारवायांमध्ये वाढ करून पाकिस्तानने भारताला चिथावणी दिली होती. यामुळे दोन्ही देशांच्या लष्करामध्ये नियंत्रण रेषेवर जोरदार संघर्ष सुरू आहे. शनिवारीही काश्मीरच्या बालाकोट आणि मंधेर सेक्टरमध्ये पाकिस्तानी जवनांकडून गोळीबार करण्यात आला. त्याआधी शुक्रवारी भारतीय लष्कराने केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने उभारलेले दहशतवाद्यांचे तळ, तसेच त्यांचा शस्त्रसाठा यांना लक्ष्य केले.

या हल्ल्यासाठी भारतीय लष्कराने 155 एमएमच्या बोफोर्स तोफा तसेच 105 एमएमच्या इतर तोफांचा वापर केला. भारतीय लष्कराचा हल्ला अत्यंत अचूक व घणाघाती होता. याला उत्तर देण्याची संधीच पाकिस्तानी दहशतवादी व पाकिस्तानच्या जवानांना मिळाली नाही. दहशतवाद्यांचे हे तळ व त्यांचा शस्त्रसाठा व दारुगोळ्याची कोठारे उद्ध्व‌स्‍त झाल्याचे व्हिडिओज भारतीय लष्कराने माध्यमांना पुरविले आहेत. यात पाकिस्तानची व पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद यांची जबर हानी झाल्याचे पाहायला मिळत आहे. आठवडाभरापूर्वी केरन सेक्टरमध्येच दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा मोठा प्रयत्न भारतीय लष्करने उधळला होता. पाकिस्तानी लष्करच्या गोळीबाराच्या आडून भारतीय सीमेत घुसखोरी करू पाहणाऱ्या पाच दहशतवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आले होते. या हल्ल्यात भारताचे पाच जवानही शाहिद झाले होते. याचा वचपाही भारतीय जवानांनी जवानांनी घेतला.

ड्रोन द्वारे चित्रीत करण्यात आलेला व्हिडीओ प्रसिद्ध करून आपल्यावर हल्ला झालाच नाही, असा बचाव करण्याची संधी पाकिस्तानला मिळू शकणार नाही याची तजवीज भारतीय लष्कराने केली. म्हणूनच भारतीय लष्कर आपल्या नागरी बसतांना लक्ष करीत असल्याचा कांगावा पाकिस्तानने सुरू केला आहे. तसेच यामध्ये काही नागरिक जखमी झाल्याचे सांगत आहे. मात्र याला पाकिस्तानातूनच प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर येत आहे.

भारताने दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त करून व त्याचा व्हिडीओ प्रसिद्ध करून यापुढे भारत कारवाई करेल आणि जगालाही दाखवेल असा स्पष्ट संदेश पाकिस्तानला दिल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

leave a reply