पाकिस्तानच्या ‘सिलेक्टेड’ पंतप्रधानांनी अफगाणिस्तानात नाक खुपसू नये

- तालिबानच्या कमांडरचा पाकिस्तानच्या पंतप्रधानांना इशारा

इस्लामाबाद – इम्रान खान पाकिस्तानी जनतेची मते घेऊन निवडून आलेले नाहीत. पाकिस्तानातच त्यांना बाहुले म्हणून हिणवले जाते. त्यांना तसे बोलण्याचा अधिकार मला नाही. पण त्यांनाही अफगाणिस्तानमध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार तालिबानने दिलेला नाही. कुणी तसा हस्तक्षेप केलाच तर तालिबान देखील त्यांच्या देशात हस्तक्षेप करील, असा सज्जड इशारा तालिबानचा कमांडर मुबिन खान याने दिला. मुबिन खान याचा व्हिडिओ पाकिस्तानात व्हायरल झाला आहे. तालिबान देखील आपल्या पंतप्रधानांची इज्जत न करता त्यांच्यावर डोळे वटारत असल्याची खंत पाकिस्तानी माध्यमे व्यक्त करीत आहेत.

पाकिस्तानच्या ‘सिलेक्टेड’ पंतप्रधानांनी अफगाणिस्तानात नाक खुपसू नये - तालिबानच्या कमांडरचा पाकिस्तानच्या पंतप्रधानांना इशारादोन दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका मुलाखतीत, तालिबानने सर्वसमावेशक सरकार स्थापन करावे, असे सुचविले होते. पाकिस्तानी पंतप्रधानांच्या या विधानांवर तालिबानचा कमांडर आणि सोशल मीडियासंबंधी प्रवक्ता मुबिन खान याने जोरदार टीका केली.

‘इम्रान खान यांचे सरकार लष्कराच्या हातातील बाहुले असल्याचे पाकिस्तानी जनताच म्हणत आहे. पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांना त्यांचे मुलभूत अधिकार मिळालेले नाहीत. पाकिस्तानचा पूर्ण समाज इम्रान खान यांच्या सरकारवर नाखूश आहे. जनता इम्रान यांच्या सरकारला लष्कराच्या हातातील बाहुले मानत असून बर्‍याच प्रमाणात ते खरे देखील आहे’, असा टोला मुबिन याने लगावला.

‘तालिबानने पाकिस्तान सरकारच्या कारभारात हस्तक्षेप केलेला नाही व तालिबानलाही पाकिस्तानकडून अशीच अपेक्षा आहे. इम्रान खान यांनी त्यांच्या देशाच्या आणि जनतेच्या समस्या सोडविण्यावर लक्ष केंद्रीत करावे. आमच्या अधिकारांचा सन्मान केला तर अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर तुमच्याविरोधात केला जाणार नाही, हे आमचे आश्‍वासन आहे. मात्र अफगाणिस्तानात हस्तक्षेप केला तर आम्हालाही तुमच्या देशात हस्तक्षेप करण्याचा पूर्ण अधिकार असेल’, असे मुबिन याने धमकावले.
तालिबानने दिलेला हा इशारा पाकिस्तानची झोप उडविणारा आहे. तालिबानला फुकटचे सल्ले देऊ नका, असे पाकिस्तानच्याच काही पत्रकारांनी आपल्या पंतप्रधानांनी बजावले आहे. अमेरिकेला अफगाणिस्तानातून पळवून लावल्याचे तालिबानचे श्रेय पाकिस्तान घेत आहे, यावर तालिबान नाराज आहे. अमेरिकेबरोबर दोन दशकांचा संघर्ष तालिबानने केला, पाकिस्तानने नाही, याची आठवण तालिबानचे दहशतवादी करून देत आहेत. अशा परिस्थितीत इम्रान खान यांच्याकडून मिळत असलेल्या सूचना तालिबानला अजिबात मान्य नाहीत. म्हणूनच कमांडर मुबिन याचा वापर करून तालिबानने इम्रान खान यांना त्यांची जागा दाखवून दिल्याचे दिसत आहे.

leave a reply