अफगाणिस्तानात तालिबानचा ‘न्याय’ व शिक्षा लागू करणार

- तालिबानचा नेता नुरूद्दीन तुराबी याची घोषणा

नुरूद्दीनकाबुल – ‘इतरांनी आम्हाला कायद्यांबाबत सांगण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही आमच्या पद्धतीने कायदे लागू करू. अफगाणिस्तानच्या सुरक्षेसाठी ठार करणे आणि हात तोडणे आवश्यक असून या शिक्षा पुन्हा सुरू केल्या जातील’, अशी घोषणा तालिबानचा वरिष्ठ नेता मुल्ला नुरुद्दीन तुराबी याने केली. पण या शिक्षा सार्वजनिकरित्या दिल्या जाणार नाही, असे सांगून हा तालिबानमध्ये झालेला मोठा बदल असल्याचा दावा तुराबीने केला. संयुक्त राष्ट्रसंघ आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर तालिबानची बाजू उचलून धरणार्‍यांसाठी तुराबीची ही घोषणा म्हणजे सणसणीत चपराक ठरते. तालिबान बदलल्याचे दावे यामुळे पूर्णपणे निकालात निघालेले आहेत.

नुरूद्दीनमुल्ला ओमर, मुल्ला बरादर यांच्याप्रमाणे तालिबानचा सहसंस्थापक असलेल्या तुराबी याने तालिबानच्या न्यायनिवाड्यांवर होणारी टीका फेटाळली. ‘तालिबानने इतर देशांमधील कायदे आणि न्यायव्यवस्थेवर कधीच टीका केली नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानच्या न्यायव्यवस्थेत नाक खुपसू नये’, असा इशारा तुराबीने दिला. तालिबानच्या नव्या न्यायव्यवस्थेत महिला न्यायाधीशांना स्थान असू शकेल, पण शिक्षा मात्र जुन्याच असतील, असे तुराबीने स्पष्ट केले.

दोन दशकांपूर्वी तालिबानने अफगाणींना दिलेल्या भयंकर शिक्षा सार्‍या जगाने पाहिल्या होत्या. खुनाचा आरोप असलेल्यांना फुटबॉलचे स्टेडियम, चौकात उभे करून त्यांच्या डोक्यात गोळ्या मारणे, छोटीमोठी चोरी करणार्‍यांचे हात छाटणे तर मोठ्या चोरांचे हात व नुरूद्दीनपाय तोडण्याच्या शिक्षा तालिबानने दिल्या होत्या. अशा शिक्षा पुन्हा अमलात आणल्या जातील असे तुराबी म्हणाला. मात्र या शिक्षा आधीप्रमाणे भर स्टेडियममध्ये दिल्या जाणार नाहीत, यावर विचार होऊ शकतो, असे सांगून तुराबीने तालिबानमध्ये झालेला हा मोठा बदल असल्याचा दावा केला.

अफगाणींना यापुढे टिव्ही, मोबाईल बाळगण्याची परवानगी असेल, कारण ही काळाची गरज असल्याचे तुराबी म्हणाला. ‘जगभरातील कोट्यवधी जणांपर्यंत संदेश पोहोचविण्यासाठी मोबाईल महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र जर कुणी शिक्षा सार्वजनिक केल्या, त्यांचे व्हिडिओ काढून प्रसिद्ध केले तर तालिबानचे नियम मोडणार्‍यांसाठी योग्य तो संदेश दिला जाईल’, असे तुराबीने बजावले आहे.

तुराबी याच्या या घोषणा तालिबान बदलल्याचे दावे करणार्‍यांना तोंडघशी पाडत आहेत. अशा क्रूर राजवटीला समर्थन देणे आता पाकिस्तान व चीनसाठी देखील सोपे राहिलेले नाही. दरदिवशी नव्या घोषणा करून तालिबान आपल्या समर्थकांसमोरील अडचणी वाढवित आहे. कारण यामुळे तालिबानचा क्रूर चेहरा जगासमोर येत आहे. जगभरात तालिबानच्या व तालिबानचे समर्थन करणार्‍यांच्या विरोधातील तिरस्कार यामुळे उफाळून येत आहे.

leave a reply