अफगाणिस्तानातील हिंसाचार कमी करण्यासाठी पाकिस्तानने तालिबानवर दबाव टाकावा

- इंटरनॅशनल क्रायसिस ग्रूप

ब्रुसेल्स – ‘अफगाणिस्तानातील हिंसाचार कमी करून येथे शांती प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानने तालिबानवर दबाव टाकावा. यासाठी पाकिस्तानने तालिबानबरोबरच्या आपल्या संबंधांचा वापर करावा. कारण अफगाणिस्तानातील शांतीचर्चा फिस्कटली तर त्याचा सर्वात मोठा फटका पाकिस्तानला बसेल’, असा इशारा इंटरनॅशनल क्रायसिस ग्रूप या संघटनेने दिला. तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता हाती घेतल्यास पाकिस्तान आपली सीमा बंद करील, अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाच दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर ब्रुसेल्सस्थित आंतरराष्ट्रीय संघटनेने हा इशारा दिला आहे.

अफगाणिस्तानातील हिंसाचार कमी करण्यासाठी पाकिस्तानने तालिबानवर दबाव टाकावा - इंटरनॅशनल क्रायसिस ग्रूपपाकिस्तानचा तालिबानशी काहीही संबंध नाही, पाकिस्तानने तालिबानचे वकिलपत्र घेतलेले नाही, असे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले होते. तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील अफगाणिस्तानातील संघर्षाचा आपल्या देशाशी संबंध नसल्याची भूमिका स्वीकारली. पण पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे अफगाण तालिबानींचे आश्रयस्थान असल्याचे व त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पाकिस्तानचेच अंतर्गत सुरक्षामंत्री कबुल करीत आहेत.

तालिबानने सुरू केलेल्या या हिंसाचाराकडे पाठ फिरविणार्‍या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय संघटना तसेच विश्लेषक इशारे देत आहेत. इंटरनॅशनल क्रायसिस ग्रूप या संघटनेने दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या ‘पाकिस्तान : शोअरिंग अप अफगानिस्तान्स पीस प्रोसेस’ या वीस पानी अहवालातून पाकिस्तानला बजावले. अफगाणिस्तानातील हिंसाचार कमी करण्यासाठी पाकिस्तानने तालिबानवर दबाव टाकावा - इंटरनॅशनल क्रायसिस ग्रूप‘अफगाणिस्तानातील नाटोच्या जलदगतीने सुरू असलेल्या माघारीचा परिणाम अफगाण सरकार आणि तालिबानमधील शांतीचर्चेवर होत आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या गनी सरकार आणि तालिबानमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करावा’ असे आवाहन केले.

अफगाणिस्तानातील ही शांतीचर्चा फिस्कटली तर, पाकिस्तानचे अफगाणिस्तान आणि अमेरिकेबरोबरचे संबंध बिघडतील. अफगाणिस्तानातील अस्थैर्य किंवा तालिबानचा या देशावरील ताबा म्हणजे तालिबानशी सहकार्यात असलेल्या पाकिस्तानातील दहशतवाद्यांना बळ देणारे ठरेल. यामुळे पाकिस्तानातील अस्थैर्य वाढेल. तेव्हा, आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानी नेत्यांनी तालिबानवर दबाव टाकावा’, असा सल्ला या अहवालातून देण्यात आला आहे.

leave a reply