पाकिस्तानने कारागृहात डांबलेल्या 300 अफगाणींची सुटका करावी

-तालिबानची पाकिस्तानकडे मागणी

taliban spoxकाबुल – गेले कित्येक महिने पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेल्या 300 अफगाणींची सुटका करावी, अशी मागणी तालिबानने पाकिस्तानकडे केली आहे. अपुऱ्या दस्तावेजांचे कारण देऊन पाकिस्तानने आश्रित अफगाणींना अटक केली होती, अशी तक्रार तालिबान करीत आहे. पण पाकिस्तानचे सरकार आणि लष्कराने तालिबानची ही मागणी अजिबात मान्य करू नये, असे आवाहन पाकिस्तानातील पत्रकार करीत आहेत. तालिबानवर नियंत्रण ठेवायचे असेल तर या अफगाणींची सुटका करू नये, असे या पत्रकारांचे म्हणणे आहे.

तालिबानच्या राजवटीच्या परराष्ट्र विभागाचा उपप्रवक्ता हफिझ झिया अहमद तकाल याने पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या अफगाणींबाबतची माहिती व्हिडिओद्वारे प्रसिद्ध केली. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील अफगाणिस्तानच्या दूतावासातील तालिबानचे पथक पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी चर्चा करून 300 जणांच्या सुटकेसाठी प्रयत्न करीत आहेत. पाकिस्तानी तुरुंगात कैद असलेल्या या अफगाणींमध्ये महिला आणि मुलांचा मोठा समावेश असल्याचा दावा केला जातो. यातील काही जणांची सुटका करण्यात यश मिळाले असून इतरांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे तकाल याने सांगितले.

taliban prisionersपाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागातून अटक झालेल्या या अफगाणींकडे पुरेशी कागदपत्रे नसल्याचा आरोप करून पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यातच पाकिस्तानने अफगाणींवर लादलेले दंड मोठे असून ते चुकविण्याची ऐपतही या अफगाणींकडे नसल्याची तक्रार तालिबानचा उपप्रवक्ता करीत आहे. काही पाकिस्तानी अधिकारी याचा गैरफायदा घेत असल्याचा आरोपही उपप्रवक्ता तकाल याने केला. पाकिस्तानातील काही नेते देखील अफगाणींना मिळत असलेल्या वागणुकीवर टीका करीत आहेत.

पाकिस्तानात किमान 15 ते 20 लाख अफगाणी निर्वासित राहत असल्याचा दावा केला जातो. गेल्या वर्षी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर लाखो अफगाणींनी शेजारी देशांमध्ये धाव घेतली होती. एकट्या पाकिस्तानात एक लाखहून अधिक अफगाणींनी सीमारेषेतून प्रवेश केल्याची माहिती पाकिस्तानी यंत्रणांनी दिली होती. या अफगाणींची हकालपट्टी करावी, अशी मागणी पाकिस्तानात वाढत आहे. पाकिस्तानवर इंधन, आर्थिक अणि अन्नधान्याचे संकट कोसळत असताना, अफगाणींना मायदेशी रवाना करण्याची मागणी सामान्य पाकिस्तानींकडून केली जात आहे.

पण पाकिस्तानातील काही पत्रकार अफगाणींना ताब्यात घेऊन आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचे पाकिस्तानच्या सरकारला सुचवित आहेत. ड्युरंड लाईन तसेच तेहरिक-ए-तालिबानबरोबरच्या वाटाघाटी यशस्वी करण्यासाठी या अफगाणींचा वापर करावा, असे या पाकिस्तानी पत्रकारांचे म्हणणे आहे.

leave a reply