इराणच्या ‘नागरी’ अणुकार्यक्रमावर ब्रिटन-फ्रान्स-जर्मनीचा संशय

UK-France-Germany suspect Iran's 'civilian' nuclear programबर्लिन/तेहरान – अमेरिकेबरोबरच्या अणुकराराच्या मोबदल्यात इराणने केलेल्या नव्या मागणीवर ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीने आश्चर्य व्यक्त केले. नवनव्या मागण्या करीत राहणाऱ्या इराणचा अणुकार्यक्रम खरोखरच नागरी वापरासाठी आहे का? असा प्रश्न करून युरोपिय देशांनी इराणवर संशय व्यक्त केला आहे. तर युरोपिय देशांचे आपल्यावरील आरोप दुर्दैवी आणि अहितकारक असल्याचे इराणने म्हटले आहे. तर अयोग्य वेळी युरोपिय देशांनी अशी प्रतिक्रिया देऊन अणुकरारात खोडा घालण्याचा प्रयत्न केल्याचे ताशेरे रशियाने ओढले आहेत.

तीन महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या ‘बोर्ड ऑफ गव्हर्नर्स’नी इराणच्या तीन अणुप्रकल्पांबाबतच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्याची सूचना केली होती. यात इराणच्या तीनही प्रकल्पांमध्ये ‘युरेनिअम ट्रेसेस’ कसे सापडले, या प्रश्नाचा समावेश होता. या महिन्याच्या सुरुवातीला इराणने अणुकराराच्या मोबदल्यात आपल्या मागण्यांचा प्रस्ताव युरोपिय महासंघाला पाठविला होता. यामध्ये अणुऊर्जा आयोगाने तीन प्रकल्पांसंबंधी सुरू केलेला तपास थांबविण्यात यावा, या मागणीचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

iran eu sanctionनेमक्या यावेळीच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने आपल्या नव्या अहवालात इराणच्या अणुकार्यक्रमावर संशय व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर, युरोपमधील प्रभावशाली देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रिटन, फ्रान्स व जर्मनी या ‘ई3’ देशांनी जाहीर केलेल्या संयुक्त निवेदनात इराणच्या नव्या मागणीवर चिंता व्यक्त केली. ‘इराणची नवी मागणी या देशाच्या अणुकराराबाबतच्या बांधिलकीवर शंका निर्माण करणारी आहे. इराणची सध्याची भूमिका आणि 2015 सालच्या अणुकरारातील बांधिलकी यात खूप मोठी तफावत आहे’, असे ई3 देशांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

इराणच्या या नव्या प्रस्तावाबाबत आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांशी चर्चा करीत असल्याचे ई3ने स्पष्ट केले. दोन दिवसांपूर्वीच फ्रान्सने अणुकरारासंबंधी इराणच्या भूमिकेवर टीका केली होती. इराणच्या मागण्या सदर अणुकरार मागे पाडू शकतात, असे फ्रान्सने म्हटले होते. ई3च्या नव्या टीकेनंतर इराणने देखील युरोपिय देशांवर ताशेरे ओढले. ब्रिटन, फ्रान्स व जर्मनी या देशांनी प्रसिद्ध केलेली प्रतिक्रिया अतिशय दुर्दैवी असल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासिर कानी यांनी म्हटले आहे. तसेच या देशांची सदर प्रतिक्रिया अणुकरारासाठी विघातक ठरेल, असा दावा इराणने केला.

दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान येर लॅपिड जर्मनीच्या दौऱ्यासाठी रवाना होत आहेत. पंतप्रधान लॅपिड जर्मन चॅन्सेलर ओलाफ शोल्झ्ा यांच्याबरोबरच्या चर्चेत इराणबरोबरच्या अणुकराराबाबत चर्चा करणार असल्याचे इस्रायली माध्यमांचे म्हणणे आहे. अणुकरार तसेच सिरियातील इराणच्या लष्करी तळांचा मुद्दाही चर्चेत येऊ शकतो. इराणविरोधात युरोपिय देशांनी ठाम भूमिका स्वीकारावी, यासाठी इस्रायलचे पंतप्रधान जर्मनीवर दबाव टाकू शकतात, असा दावा ही माध्यमे करीत आहेत.

leave a reply