किशनगंगा नदीमार्गे शस्त्र तस्करीचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतीय लष्कराने उधळला

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये किशनगंगा नदीतून शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला आहे. सुरक्षादलाच्या कारवाईत चार एके-४७, आठ मॅगझिन्स आणि २४० एके रायफलच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी कुलगाम जिल्ह्यात सुरक्षादलांचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. घटनास्थळावरून जवानांनी एम-४ रायफल आणि एक पिस्तुल हस्तगत करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

किशनगंगा नदीमार्गे शस्त्र तस्करीचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतीय लष्कराने उधळलाशुक्रवारी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास गस्ती पथकाला केरन सेक्टरमधील किशनगंगा नदी पात्रात काही हालचाली सुरु असल्याचे दिसले. त्यानंतर लष्कर व पोलिसांनी संयुक्त मोहीम हाती घेतली. सकाळी १० वाजताच्या सुमारास दोन ते तीन दहशतवादी दोरीच्या सहाय्याने ट्यूबमधून काहीतरी पाठवत असल्याचे आढळले. त्यानंतर तात्काळ कारवाई करत सुरक्षादलाच्या जवानांनी शस्त्रसाठा जप्त केला. या घटनेनंतर या संपूर्ण परिसराला वेढा घालून शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.

याआधी अशाचपद्धतीने दोरी आणि ट्यूबचा वापर करून पाकिस्तानातून होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीचा प्रयत्न बीएसएफने उधळला होता. सुरक्षादलांच्या सतर्कतेमुळे पाकिस्तानला जम्मू-कश्मीरमध्ये हिंसक कारवाया करण्यासाठी दहशतवाद्यांपर्यंत शस्त्र पोहोचवणे कठीण होऊन बसले आहे. यामुळे पाकिस्तानी दहशतवादी संघटनाकडून भारतात शस्त्र व स्फोटकांची तस्करी करण्यासाठी निरनिराळे मार्ग अवलंबले जात आहे. ड्रोनद्वारे शस्त्रतस्करीचे प्रयत्न वारंवार होत आहेत. तसेच नदीमार्गानेही ट्यूबच्या साहाय्याने शस्त्रे सीमेपलीकडून भारतात पोहोचवली जात आहेत.

किशनगंगा नदीमार्गे शस्त्र तस्करीचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतीय लष्कराने उधळलागेल्याच महिन्यात जम्मू काश्मीरच्या बंदिपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमधील तुलई येथील किशनगंगा नदीत दोन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत ६ एके- ४७च्या मॅगझिन, २७० राऊंड्स, चिनी पिस्तूलच्या ६५ राऊंड्स, हॅन्ड ग्रेनेड, दोन एमटीआर कोरडेक्स, १५ डिटोनेटर, १ ब्लॅक रेडिओ व जीपीएससह अन्य साहित्य जप्त करण्यात आले होते.

दरम्यान, कुलगाम जिल्ह्यातील चिंगम परिसरात दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती सुरक्षादलाला मिळाली होती. यानंतर संपूर्ण परिसराला वेढा घालून शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी उडालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले. याभागात व्यापक शोधीमोहीम हाती घेण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानव्याप्त लॉंचपॅडवर २५० ते ३०० दहशतवादी आहेत. दहशतवाद्यांकडून वारंवार घुसखोरीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र सुरक्षादलाकडून हे प्रयत हणून पाडण्यात येत आहेत.

leave a reply