पाकिस्तान-तालिबान मिळून अफगाणिस्तानची ओळख व संस्कृती संपवित आहेत

- पाकिस्तानच्या माजी संसद सदस्यांचा आरोप

अफगाणिस्तानची ओळखऍम्स्टरडॅम – ‘‘पाकिस्तानचे लष्कर आणि गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’ तालिबानला हाताशी धरुन अफगाणिस्तानची ओळख व संस्कृती नष्ट करीत आहे. अफगाणिस्तानला पाकिस्तानच्या वर्चस्वाखाली आणण्याचा कुटील डाव त्यामागे आहे’, असा आरोप पाकिस्तानच्या संसदेचे माजी नेते अफ्रासियाब खट्टक यांनी केला. पाकिस्तानचे हे इरादे ‘पश्तून तहफ्फूज मुव्हमेंट’ला ठाऊक असल्यामुळेच पाकिस्तानचे लष्कर या गटाचे नेते व समर्थकांवर कारवाई करीत असल्याचा ठपकाही खट्टक यांनी ठेवला.

साधारण तीन महिन्यांपूर्वी तालिबानने काबुलचा ताबा घेतल्यानंतर पाकिस्तानातील कट्टरपंथिय नेते तसेच काही पत्रकारांना त्याचा जल्लोष साजरा केला होता. पण काही राजकीय नेते व सूज्ञ पत्रकारांनी या घटनेकडे सावधपणे पाहण्याचा इशारा दिला होता. पाकिस्तानच्या अवामी नॅशनल पार्टी-एएनपीचे वरिष्ठ नेते तसेच माजी पाकिस्तानी संसदसदस्य अफ्रासियाब खट्टक यापैकी एक होते. अफगाणिस्तानातील तालिबानच्या हल्ल्यांसाठी पाकिस्तानची आयएसआय जबाबदार असल्याची टीका खट्टक यांनी याआधी केली होती. नेदरलँडमधील ‘युरोपियन फाऊंडेशन फॉर साऊथ एशियन स्टडिज्-ईएफएसएएस’ या अभ्यासगटाशी बोलताना खट्टक यांनी पाकिस्तान तसेच तालिबानवर गंभीर आरोप केले.

‘चार दशकांपूर्वी अफगाणिस्तानात गृहयुद्ध पेटलेले असताना पाकिस्तानच्या लष्कराने अमेरिका आणि अरब देशांच्या सहाय्याने अफगाणिस्तानात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. अफगाणी निर्वासितांना पाकिस्तानने धार्मिक कट्टरवादाच्या प्रभावाखाली आणले. याद्वारे पाकिस्तानने अफगाणींची पश्तू ओळख पुसून टाकून त्यांना कट्टरवादी बनविले’, असा घणाघाती हल्ला खट्टक यांनी चढविला. यासाठी पाकिस्तानच्या आयएसआयने तालिबानला हाताशी धरले असून दोघे मिळवून अफगाणिस्तानची मूळ ओळख नष्ट करीत असल्याचा ठपका खट्टक यांनी ठेवला. इतकेच नाही तर याआधी सत्तेवर असताना आणि आत्ताही तालिबान अफगाणिस्तानचा सांस्कृतिक वारसा उद्ध्वस्त करीत आहेत. असे करून तालिबान अफगाणिस्तानला पाकिस्तानच्या सांस्कृतिक वर्चस्वाखाली आणण्याचा प्रयत्न करीत असून यामुळे तालिबान पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयची उद्दीष्टे पूर्ण करीत आहे’, असा घणाघात खट्टक यांनी केला.

अफगाणिस्तानातील पश्तू ओळख व संस्कृती संपवून या देशाला आपल्या वर्चस्वाखाली आणण्याचा पाकिस्तानी लष्कर व आयएसआयचा कट ‘पश्तून तहफ्फूज मुव्हमेंट-पीटीएम’ हा पश्तू गट चांगलाच ओळखून आहे. म्हणूनच पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणा पश्तू नेते, कार्यकर्ते व जनतेला लक्ष्य करीत असल्याचा आरोप खट्टक यांनी केला. उघडपणे उल्लेख केला नसला तरी खैबर-पख्तूनख्वा प्रांतात पाकिस्तानी लष्कराकडून स्थानिकांवर होणार्‍या अत्याचाराकडे खट्टक यांनी लक्ष वेधल्याचे दिसत आहे.

तालिबानला हाताशी घेऊन अफगाणिस्तानची ओळख व संस्कृती नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या पाकिस्तानने त्याऐवजी भारताबरोबर संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करावे, असे खट्टक यांनी सुचविले. पाकिस्तानच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी भारताबरोबर समेट करणे आवश्यक असल्याचे खट्टक म्हणाले. पाकिस्तानातील काही पत्रकार देखील याच मताचे आहेत. पाकिस्तान टिकवायचा असेल तर भारताबरोबरचे वाद मिटवावे लागतील. यासाठी पाकिस्तानने आपल्या लष्करीखर्चात कपात करावी आणि भारतविरोधी धोरणे बदलावी, असे या पत्रकारांचे म्हणणे आहे.

leave a reply