इराणचा दहशतवाद जगाला अंधाराच्या गर्तेत ढकलून देईल

- इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा

इराणचा दहशतवादजेरूसलेम – ‘इराणचा दहशतवाद इस्रायलला नष्ट करण्याच्या तसेच जगावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. याचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर इराणचा दहशतवाद जगाला अंधाराच्या गर्तेत ढकलून देईल’, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी दिला. त्याचबरोबर युएई आणि बाहरिन या आखाती देशांबरोबर प्रस्थापित झालेल्या सहकार्यामुळे इस्रायलसाठी नवी पहाट उगवल्याचा दावा पंतप्रधान बेनेट यांनी केला. काही तासांपूर्वीच इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी इस्रायलच्या विनाशाच्या घोषणा दिल्या होत्या. त्यावर इस्रायलच्या पंतप्रधानांची ही प्रतिक्रिया आली आहे.

इस्रायलच्या सरकारकडून दरवर्षी ‘ख्रिश्‍चन मीडिया समिट’चे आयोजन केले जाते. यामध्ये जगभरातील आघाडीच्या वृत्तसंस्थांचे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पत्रकार आणि विश्‍लेषकांना आमंत्रित केले जाते. कोरोनामुळे या वर्षी सदर बैठकीचे व्हर्च्युअल आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला संबोधित करताना इस्रायलचे पंतप्रधान बेनेट यांनी इराणच्या धोक्याची जाणीव करून दिली.

‘आज सारे जग कोरोनासारख्या अदृश्य शत्रूशी लढत आहे. तर इस्रायल आणि आखाती देश गेली काही वर्षे इराणचा दहशतवाद नामक दृश्य शत्रूशी संघर्ष करीत आहेत’, असे सांगून पंतप्रधान बेनेट यांनी इराण आखातातील दहशतवादाचा प्रायोजक असल्याचा ठपका ठेवला. त्याचबरोबर इराणने पसरविलेला दहशतवाद आज जगावर नियंत्रण मिळविण्याच्या बेतात असल्याचा आरोप इस्रायलच्या पंतप्रधानांनी केला.

कुठल्याही देशाने ईश्‍वराच्या नावाखाली कुणाचाही जीव घेऊ नये, युद्ध पुकारू नये आणि द्वेष परसवू नये, असे आवाहन करुन बेनेट यांनी इराणला लक्ष्य केले. ख्रिस्तधर्मिय आखातात इस्रायलमध्ये सर्वाधिक सुरक्षित, भरभराट झालेले आणि समृद्ध आहेत. म्हणूनच ख्रिस्तधर्मियांची इस्रायलबरोबर एकजूट असल्याचा दावा पंतप्रधान बेनेट यांनी केला. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लॅपिड यांनी देखील ख्रिस्त व ज्यूधर्मिय एकत्र येऊन अब्राहम करारात सहभागी देशांची संख्या वाढवू शकतात, असे म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या वरिष्ठ अधिकार्‍याने इस्रायलच्या विनाशाच्या धमक्या दिल्या होत्या. इस्रायलने इराणविरोधात युद्ध पुकारले तर इराण त्याचा अंत करील, असा इशारा ब्रिगेडिअर जनरल अमीर अली हाजीझदेह यांनी दिला होता. इस्रायलच्या पंतप्रधानांनी या धमकीकडे लक्ष वेधून इराणपासून असलेला धोका अधोरेखित केला. त्याचवेळी इस्रायलने देखील इराणच्या अणुप्रकल्पांवर हवाई हल्ले चढविण्याची घोषणा केली होती.

leave a reply