अरबी समुद्रात पाकिस्तान कडून जहाजभेदी क्षेपणास्त्रांच्या चाचण्या

इस्लामाबाद, (वृत्तसंस्था) – कोरोनाव्हायरसच्या संकटाने सारे जग हवालदिल झालेले असताना पाकिस्तानने मात्र अरबी समुद्रात जहाजभेदी क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या. तसेच काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे तैनात केल्याचे वृत्त आहे. या बातम्या प्रसिद्ध होत असताना अंडरवर्ल्ड आणि स्मगलर्सचा वापर करून पाकिस्तान सागरी मार्गाने भारतावर हल्ले करण्याची तयारी करीत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. भारतीय नौदलाच्या युद्धनौका व भारताची पश्चिम किनारपट्टी पाकिस्तानच्या या हल्ल्याच्या निशाण्यावर असू शकेल, असे दावे गुप्तचर विभागाने केले आहेत.            

पाकिस्तानच्या नौदलाने अरबी समुद्रात ‘अँटी शिप मिसाईल्स’  अर्थात जहाजभेदी क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या. या चाचणीनंतर पाकिस्तानच्या नौदलप्रमुखांनी चिथावणीखोर विधाने केली आहेत. पाकिस्तानचे नौदल कुठल्याही आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचे पाकिस्तानच्या नौदल प्रमुखांनी म्हटले आहे. पाकिस्तान ही चाचणी करीत असताना स्मगर्लस व अंडरवर्ल्डचा वापर करून पाकिस्तान भारताला लक्ष्य करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा गुप्तचर विभागाकडून मिळाल्याच्या बातम्या भारतीय माध्यमांनी दिल्या आहेत.  यासाठी पाकिस्तानच्या कराची बंदरानजीक प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून देण्यात आली आहे.                   

एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाकिस्तानी सागरी सुरक्षा यंत्रणांनी भारतीय मच्छीमार नौकेवर गोळीबार केला होता. भारताने याची गंभीर दखल घेऊन याप्रकरणी पाकिस्तानच्या  राजनैतिक अधिकाऱ्यांना समन्स बजावले होते.तसेच आधीच्या काळात पाकिस्तानी जहाजे संशयास्पदरित्या या क्षेत्रात वावरत असल्याचे समोर आले होते. अण्वस्त्रांंसाठी लागणारे साहित्य घेऊन चीन मधून पाकिस्तानला निघालेले जहाज  भारताने अडवले  होते व त्यातील साहित्य जप्त केले होते. यामुळे चीन व पाकिस्तानचे छुपे आण्विक सहकार्य पुन्हा एकदा जगाच्या समोर आले होते.                         

काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर ही पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी गोळीबार करण्याचे सत्र सुरू ठेवले आहे. त्याला भारताकडून सडेतोड प्रत्युत्तर दिले जात असले तरी या आघाडीवर पाकिस्तान माघार घ्यायला तयार नाही. नुकतेच पाकिस्तानने काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर जमिनीतून आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्रे तैनात केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे पाकिस्तानला कोरोनाव्हायरसच्या साथीचा मुकाबला करण्यापेक्षा भारताबरोबर तणाव वाढवण्यात व संघर्ष पुकारण्यात अधिक स्वारस्य असल्याचे यामुळे समोर येत आहे.

leave a reply