कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या दोन लाखांवर

वॉशिंग्टन – गेल्या चार माहिन्यांहून अधिक काळ जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाव्हायरसने दोन लाखाहून अधिक जणांचा बळी घेतला आहे. या साथीची लागण झालेल्या जगभरातील ५८ हजार रुग्णांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. कोरोनाच्या एकूण बळींपैकी ३३ टक्के रुग्ण अमेरिकेतील आहेत. तर या साथीची लागण झालेले ८,१९,३१० रुग्ण बरे झाले आहेत.

कोरोनाव्हायरसमुळे जगभरात दगावलेल्यांची संख्या २,००,४३० वर पोहोचली आहे. जगभरात या साथीचे एकूण २८,६७,९८४ रुग्ण आहेत. गेल्या चोवीस तासात या साथीत सात हजार जण दगावले आहेत. यापैकी अमेरिकेत १९०० हून अधिक जणांचा बळी गेला असून यात न्यूयॉर्कमधल्या ४२२ बळींचा समावेश असल्याची माहिती जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने दिली. तर या देशात एकाच दिवसात ३५ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या चोवीस तासात कोरोनाव्हायरसने ब्रिटनमध्ये ८१३ जण दगावले असून या देशातील एकूण बळींची संख्या वीस हजारावर गेली आहे. त्याचबरोबर ब्रिटनमधील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या दीड लाखांच्या जवळ पोहोचली आहे. इतर युरोपिय देशांच्या तुलनेत ब्रिटनमधील बळी आणि रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचा निष्कर्ष जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने नोंदविला आहे. येत्या सोमवारपासून या साथीतून बाहेर पडलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉनसन आपल्या पदाचा कार्यभार संभाळणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, आफ्रिकेतील एकूण बळींची संख्या १३५२ वर गेली असून आफ्रिकी देशांमध्ये ३०,४२२ रुग्ण आहेत. गेल्या आठवड्याभरात आफ्रिकी देशांमधील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत ४३ टक्क्यांनी वाढ झाल्याची चिंता अमेरिकी गटाने व्यक्त केली. वैद्यकीय सुविधांचा अभाव असणाऱ्या आफ्रिकी देशांसाठी ही अत्यंत धोकादायक बाब असल्याचे या गटाने म्हटले आहे.

leave a reply