भारताने एस-४००ची तैनाती केल्याचे वृत्त आल्यानंतर पाकिस्तानकडून बाबर क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली – भारताने रशियाकडून खरेदी केलेल्या एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणेचे पहिले स्क्वाड्रन पंजाबमध्ये तैनात करण्यात आल्याचे वृत्त आहे. यामुळे पाकिस्तानात खळबळ माजली असून भारत लवकरच पाकिस्तानवर हल्ला चढविण्याची तयारी करीत असल्याची चर्चा या देशात सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर, पाकिस्तानने आपल्या ‘बाबर’ या क्रूज क्षेपणास्त्राची चाचणी करून आपली असुरक्षितता प्रदर्शित केल्याचे दिसते.

भारताने एस-४००ची तैनाती केल्याचे वृत्त आल्यानंतर पाकिस्तानकडून बाबर क्षेपणास्त्राची चाचणीएस-४०० भारताच्या ताफ्यात आल्यानंतर एकाच वेळी पाकिस्तान व चीनकडून होणारे हवाई हल्ले रोखण्याची जबरदस्त क्षमता भारतीय संरक्षणदलांना मिळेल. तसेच यामुळे पाकिस्तानवर हल्ला चढवूनही भारत स्वतःला पाकिस्तानच्या क्षेपणास्त्रांपासून सुरक्षित राखू शकतो, अशी चिंता पाकिस्तानचे माजी लष्करी अधिकारी व पत्रकार व्यक्त करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, नुकतीच रशियाकडून मिळालेल्या ‘एस-४००’चे पहिले स्क्वाड्रन पंजाबमध्ये तैनात केल्याची बातमी आलेली आहे. याने पाकिस्तान हवालदिल झाल्याचे दिसते.

गेल्या काही महिन्यांपासून भारत पाकिस्तानवर हल्ला चढविल, या चिंतेने पाकिस्तानचे नेते व लष्कराला ग्रासलेले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारत व पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध पेट घेईल, असा इशारा दिला होता. पाकिस्तानने यापुढे भारताच्या विरोधात दहशतवादी कारवाया केल्या, तर भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करताना कचरणार नाही, असे इशारे भारताचे संरक्षणमंत्री देत आहेत. त्यामुळे भारताच्या हल्ल्याची पाकिस्तानला वाटत असलेली भीती अधिकच तीव्र झाली आहे. अशा परिस्थितीत एस-४००च्या तैनातीची बातमी आल्यानंतर पाकिस्तानने बाबर या आपल्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी केली. याद्वारे आपण भारतापासून सुरक्षित असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न पाकिस्तानचे लष्कर करीत आहे. पण प्रत्यक्षात भारताच्या संरक्षणसिद्धतेमुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाल्याचे उघड होत आहे. पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये याबाबत सुरू असलेल्या चर्चा हेच दाखवून देत आहेत.

leave a reply