पंतप्रधान मोदी व राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या चर्चेने विश्‍लेषकांचे लक्ष वेधले

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा पार पडली. राष्ट्राध्यक्ष पुतिन काही दिवसांपूर्वी भारताच्या भेटीवर आले होते. या भेटीत उभय देशांमध्ये सुमारे २८ सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या झाल्या होत्या. यातील काही करारांचे स्वरूप गोपनीय असल्याची माहिती रशियन अधिकार्‍यांनी दिली होती. भारताचा चीनबरोबर व रशियाचा अमेरिका-नाटोबरोबरील तणाव वाढलेला असताना, भारत व रशियाच्या सहकार्याला फार मोठे धोरणात्मक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, पंतप्रधान मोदी व राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात सोमवारी झालेली चर्चा लक्षवेधी ठरते.

पंतप्रधान मोदी व राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या चर्चेने विश्‍लेषकांचे लक्ष वेधले‘माझे मित्र राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी माझी चर्चा पार पडली. या चर्चेत द्विपक्षीय सहकार्य, खतांचा पुरवठा यांच्याबरोबरच बहुपक्षीय व्यासपीठांवरील उभय देशांचा समन्वय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींवर विचारविनिमय झाला’, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. पंतप्रधान कार्यालयाने या चर्चेची माहिती देताना, रशियाच्या अतिपूर्वेकडील इंधनसंपन्न भागात सहकार्य वाढविण्यावर दोन्ही नेत्यांचे बोलणे झाल्याचे म्हटले आहे. तसेच भारत व रशियामधील लष्करी सहकार्याच्या नव्या संधींवरही यावेळी चर्चा पार पडल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.

भारतभेटीवर असताना, भारताने केलेल्या पाहुणचाराने आपण भारावून गेल्याचे रशियन राष्ट्राध्यक्षांनी म्हटल्याची माहिती रशियन यंत्रणांनी दिली आहे. दरम्यान, रशियाने भारताला पुरविलेली एस-४०० ही प्रगत हवाई सुरक्षा यंत्रणा पंजाबमध्ये तैनात करण्यात येत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्याचवेळी भारत रशियाकडून एस-४००हून अधिक प्रगत असलेली ‘एस-५००’ हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. भारतच या अतिप्रगत यंत्रणेचा पहिला खरेदीदार असेल, असा दावा रशियाच्या उपपंतप्रधानांनी काही दिवसांपूर्वी केला होता. एस-४००च्या करारावर आक्षेप घेऊन भारतावर निर्बंध लादण्याची धमकी देणार्‍या अमेरिकेसाठी हा धक्का ठरतो. चीन व पाकिस्तान देखील भारत व रशियाच्या या सहकार्यामुळे अस्वस्थ बनल्याचे संकेत मिळत आहेत.

याबरोबरच काहीजण रशियाने भारत व चीनच्या वादात मध्यस्थाची भूमिका पार पाडण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी भारताच्या दौर्‍यानंतर, चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी व्हर्च्युअल माध्यमातून चर्चा केली होती. त्यानंतर राष्ट्रध्यक्ष पुतिन यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी पुन्हा एकदा फोनवरून चर्चा झाली आहे, हा योगायोग नाही. तर तो भारत व चीन या आपल्या मित्रदेशांमध्ये समेट घडवून आणण्याचा रशियाचा प्रयत्न असल्याचे दावे काहीजण करीत आहेत.

त्याचवेळी अफगाणिस्तानातील घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर, पंतप्रधान मोदी व राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यातील चर्चेचे महत्त्व अधिकच वाढले आहे. भारत अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीला मान्यता देण्याच्या विचारात असून यासाठी रशिया, इराण व मध्य आशियाई देशांचे सहाय्य घेत असल्याची खबर पाकिस्तानातील एका पत्रकाराने दिली होती. तसे झाले तर अफगाणिस्तानवरील भारताचा प्रभाव पुन्हा एकदा प्रचंड प्रमाणात वाढेल व याच्या शक्यतेने पाकिस्तानला धडकी भरली आहे. म्हणूनच पाकिस्तानने आपण तालिबानसाठी बरेच काही करीत असल्याचे दाखविण्यासाठी ‘ओआयसी’ची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीतून तालिबानच्या हाती काहीही पडले नाही, उलट या बैठकीत तालिबानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान झाला होता. यामुळे तालिबानचे नेते पाकिस्तानवर खवळले असून त्यांच्या संतापाची धग पाकिस्तानला स्पष्टपणे जाणवू लागली आहे.

या कारणामुळे पंतप्रधान मोदी व राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यातील चर्चेत अफगाणिस्तानचा मुद्दा अग्रस्थानी असावा, अशीही शक्यता समोर येत आहे.

leave a reply