भारताच्या तालिबानबरोबरील प्राथमिक चर्चेने पाकिस्तान अस्वस्थ

इस्लामाबाद – भारतीय शिष्टमंडळाने अफगाणिस्तानला दिलेल्या भेटीवर तालिबानची प्रतिक्रिया आली आहे. भारताबरोबरील उत्तम संबंधांची ही सुरूवात ठरेल, असे तालिबानच्या राजवटीने म्हटले आहे. तर पुढच्या काळात अफगाणी लष्कराच्या अधिकाऱ्यांना ट्रेनिंगसाठी भारतात पाठविण्यास हरकत नसेल, असे तालिबानचे संरक्षणमंत्री मुल्ला याकूब याने म्हटले आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने अफगाणिस्तानात इतर कुठल्याही देशाने विघातक भूमिका पार पाडू नये, असे म्हटले आहे. यामुळे भारताच्या तालिबानबरोबरील संबंधांचा धसका पाकिस्तानने घेतल्याचे स्पष्टपणे दिसते आहे.

अफगाणिस्तान तालिबानची राजवट आल्यानंतर आपला सुवर्णकाळ सुरू होईल, असा समज पाकिस्तानने करून घेतला होता. म्हणूनच राजधानी काबुल तालिबानच्या हाती पडल्यानंतर पाकिस्तानात जल्लोष झाला. पण आता पाकिस्तानचे तालिबानबरोबरील संबंध सुरळीत राहिलेले नाहीत. उलट अफगाणिस्तान-पाकिस्तानमधील ड्युरंड लाईन सीमेवर चकमकी सुरू झाल्या आहेत. इतकेच नाही तर पाकिस्तानच्या काही मागण्या तालिबानने स्पष्टपणे धुडकावून लावल्याचे दिसत आहे. त्याच प्रमाणात तालिबान भारताशी संबंध सुधारण्यासाठी धडपड करीत असल्याचे ठळकपणे जगासमोर येत आहे.

pakistan-upsetभारताने अफगाणिस्तानातील आपला दूतावास सुरू करावा. तसेच अफगाणिस्तानातील आपले विकासप्रकल्प देखील सुरू करावे, असा प्रस्ताव तालिबानने दिला होता. त्याचवेळी उपासमार होत असलेल्या अफगाणी जनतेसाठी भारताने सुमारे 50 हजार मेट्रिक टन इतका गव्हाच्या पुरवठ्याची घोषणा केली, याचीही दखल तालिबानच्या राजवटीला घ्यावी लागली. याबरोबरच कोरोनाच्या लसी व औषधांचा पुरवठा करून भारताने तालिबानला आपलेसे केल्याचे दावे पाकिस्तानातील विश्लेषक आणि पत्रकार करीत आहेत. भारताने आत्तापर्यंत अफगाणी जनतेसाठी केलेले हे सहाय्य योग्यरितीने अफगाणींपर्यंत पोहोचले आहे का, याची पाहणी करण्यासाठी भारताच्या शिष्टमंडळाने अफगाणिस्तानला भेट दिली होती.

भारताचे राजनैतिक अधिकारी जे. पी. सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली अफगाणिस्तानात गेलेल्या या शिष्टमंडळाचे तालिबानने स्वागत केले. यावेळी चर्चा म्हणजे भारताबरोबरील उत्तम संबंधांची सुरूवात ठरते, असे तालिबानने म्हटले होते. यानंतर एका भारतीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तालिबानचा संरक्षणमंत्री मुल्ला याकूब याने केलेली विधाने अतिशय गाजली. अफगाणी लष्करी अधिकाऱ्यांना भारतात प्रशिक्षणासाठी पाठविण्यास काहीच हरकत नाही, असे मुल्ला याकूब म्हणाला होता.

तालिबान अशारितीने भारताशी संबंध प्रस्थापित करू पाहत असल्याचे समोर येताच, पाकिस्तानची गाळण उडल्याचे दिसत आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते असिम इफ्तिकार यांनी कुठल्याही देशाने अफगाणिस्तानात विघातक भूमिका पार पाडू नये. पाकिस्तानला शांत, स्थिर आणि समृद्ध अफगाणिस्तान अपेक्षित आहे, असे म्हटले आहे. अप्रत्यक्षपणे भारत अफगाणिस्तानात नकारात्मक भूमिका बजावत असल्याचा आरोप पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालय करीत आहे. त्याला कुणाकडूनही दुजोरा मिळण्याची शक्यता नाही. उलट अफगाणिस्तानात आत्तापर्यंत पाकिस्ताननेच नकारात्मक भूमिका बजावली होती, यावर अनेक देशांची सहमती आहे.

तालिबानची राजवट आल्यानंतर अफगाणिस्तानात पाकिस्तानला अपेक्षित असलेल्या गोष्टी घडलेल्या नाहीत. उलट पाकिस्तानच्या चिंतेत भर घालणाऱ्या घडामोडी अफगाणिस्ताना सुरू आहेत. पुढच्या काळात भारत तालिबानचा वापर करून पाकिस्तानला आव्हान देईल, अशी भीती पाकिस्तानातील विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

leave a reply