गव्हाच्या निर्यातीबाबतचे भारताचे धोरण सुस्पष्ट

-व्यापारमंत्री पियूष गोयल

नवी दिल्ली – भारतातून आलेला गहू निकृष्ट दर्जाचा असल्याचा ठपका ठेवून तुर्कीने या गव्हाची खरेदी करण्यास नकार दिल्याच्या बातम्या येत आहेत. पण भारतीय कंपनीने तुर्कीला नाही तर हा गहू नेदरलँडमध्ये पाठविला होता. हा गहू तुर्कीमध्ये कसा पोहोचला, ते स्पष्ट झालेले नाही. पण भारताने एका देशासाठी पाठविलेल्या गव्हाची निर्यात दुसऱ्या देशात होता कामा नये, असे भारताचे स्पष्ट धोरण असल्याचे व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी म्हटले आहे. भारताला जगभरातील गरजू व गोरगरीब आणि मित्रदेशांमधील जनतेला शक्य तितक्या प्रमाणात गहू पुरवायचा आहे, असे सांगून गोयल यांनी कुणालाही आपले उखळ पांढरे करण्याची संधी भारत देणार नसल्याचे बजावले.

goyalरशिया व युक्रेन हे जगाला गव्हाचा पुरवठा करणारे प्रमुख देश आहेत. या देशांमध्ये पेटलेल्या युद्धामुळे जगभरात गव्हाची टंचाई निर्माण झाली आहे. त्याचवेळी भारताच्या कोठारात गव्हाचा मोठा साठा असून भारताकडे गव्हासाठी जगभरातून मागणी येत आहे. सुरूवातीच्या काळात गहू पुरविण्याचा निर्णयघेणाऱ्या भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. देशांतर्गत पातळीवर गव्हाच्या दरात वाढ झाल्याने भारताला हा निर्णयघ्यावा लागला. पण त्यानंतरच्या काळात भारताने गव्हाची निर्यात करावी अशी मागणी सुरू झाली. काही देशांनी तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने यासाठी भारताकडे याचना देखील केली होती.

मात्र भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातलेली नाही. यासंदर्भात भारत इतर देशांच्या सरकारांबरोबर (गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट) व्यवहार करील, असा खुलासा सरकारने दिला होता. तसेच गरजू आणि गरीबांना अधिकाधिक प्रमाणात गव्हाचा पुरवठा व्हावा, व्यापाऱ्यांना साठेबाजी करून उखळ पांढरे करण्याची संधी मिळू नये, असे भारताचे धोरण असल्याचे व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी स्पष्ट केले. तसेच मित्रदेशांना गव्हाच्या पुरवठ्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असेही गोयल पुढे म्हणाले.

यापुढे खाजगी कंपन्यांना गव्हाची निर्यात करण्याची परवानगी दिली जाणार नाही. सरकारच्या परवानगीनंतरच गहू निर्यात करता येईल, असे व्यापारमंत्री गोयल यांनी बजावले आहे. दरम्यान, युक्रेनच्या युद्धामुळे निर्माणझालेल्या भयंकर आर्थिक संकटाच्या काळात, भारताकडे आपल्या जनतेची मागणी पूर्ण करण्याइतका पर्याप्त प्रमाणात अन्नधान्याचा साठा आहे, ही निर्णायक बाब ठरते. या आघाडीवर विकसित देश देखील हतबल झाल्याचे चित्र गेल्या काही आठवड्यांमध्ये पहायला मिळाले होते. मात्र भारताकडे अन्नधान्याची निर्यात करण्याची क्षमता असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताचे महत्त्व अधिकच वाढल्याचे समोर येत आहे.

leave a reply