पाकिस्तानला भारताबरोबर कायमस्वरूपी शांती हवी आहे

- पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा प्रस्ताव

कायमस्वरूपी शांतीइस्लामाबाद – पाकिस्तान आणि भारताला आणखी एक युद्ध परवडणारे नाही. त्यामुळे काश्मीरचा प्रश्न वाटाघाटीतून सोडविणे अतिशय महत्त्वाचे ठरते, असा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केला आहे. हावर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांसमोर बोलताना, तसेच ऑस्ेलियाने पाकिस्तानसाठी नियुक्त केलेल्या नव्या राजदूतांशी चर्चा करताना पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताला हा शांततेचा प्रस्ताव दिला. त्यांच्या या प्रस्तावातून आपल्या देशाची अगतिकता जगासमोर येत असल्याची टीका पाकिस्तानातील विश्लेषकांनी केली आहे.

सप्टेंबर महिन्यात ‘शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन-एससीओ’ची बैठक उझबेकिस्तानच्या समरकंद येथे होणार आहे. त्याचे औचित्य साधून भारताशी राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू करण्याचा आणखी एक प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची विधाने हा त्याचाच भाग ठरतो. युद्ध नको म्हणून काश्मीरचा प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा करा – असे याआधीही पाकिस्तानने बऱ्याच वेळा भारताला सुचविले होते. पण पाकिस्तानला सध्याच्या परिस्थितीत युद्ध नको असले, तरी या देशाला भारताबरोबर शांतता अपेक्षित नाही, हे अनेकवार स्पष्ट झालेले आहे.

थेट युद्ध न पुकारता भारताचे शक्य तितके नुकसान करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून अजूनही सुरू आहे. सध्या मुंबईसह देशभरात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी घातपात माजविण्यासाठी प्रयत्न करीत असून तशा धमक्याही उघडपणे दिल्या जात आहेत. जम्मू व काश्मीरमध्ये अजूनही पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संस्था आयएसआय घातपाती कारवाया करून निरपराध नागरिकांचे बळी घेत आहे. या पार्श्वभूमीवर, पाकिस्ताचे पंतप्रधान देत असलेला हा प्रस्ताव भारत गांभीर्याने घेण्याची शक्यता नाही. तरीही पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिलेल्या या प्रस्तावामागे या देशाला वाटत असलेली चिंता असावी, अशी दाट शक्यता वर्तविली जाते.

जम्मू व काश्मीरमध्ये अजूनही पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संस्था आयएसआय घातपाती कारवाया करून निरपराध नागरिकांचे बळी घेत आहे. या पार्श्वभूमीवर, पाकिस्ताचे पंतप्रधान देत असलेला हा प्रस्ताव भारत गांभीर्याने घेण्याची शक्यता नाही. तरीही पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिलेल्या या प्रस्तावामागे या देशाला वाटत असलेली चिंता असावी, अशी दाट शक्यता वर्तविली जाते.

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी रशियाला भेट देऊन रशियाचे सुरक्षा सल्लागार निकोलाय पात्रुशेव्ह यांच्याशी चर्चा केली होती. यामध्ये युक्रेनचे युद्ध आणि इतर मुद्यांबरोबर अफगाणिस्तानचाही समावेश होता. तालिबानची राजवट आलेली असताना देखील भारताचा अफगाणिस्तानवरील प्रभाव वाढू लागल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. पाकिस्तानपासून फारकत घेऊन तालिबानने भारताशी उत्तम संबंध प्रस्थापित करण्याची तयारी दाखविली आहे. अफगाणिस्तानात पुन्हा भारताचे दूतावास सुरू करून इथले बंद पडलेले भारताचे विकासप्रकल्प देखील नव्याने सुरू करण्याची मागणी तालिबान करीत आहे. भारताच्या अफगाणिस्तानातील या मोहिमेला रशियाचीही साथ मिळत असून पुढच्या काळात यामुळे पाकिस्तानसमोरील अडचणी वाढू शकतात.

याची जाणीव झाल्याने पाकिस्तान हवालदिल बनला आहे. तालिबानची राजवट आल्यानंतर अफगाणिस्तानचा भारताच्या विरोधात वापर करून काश्मीरमध्ये भीषण रक्तपात घडविण्याचे भयंकर कारस्थान पाकिस्तानने आखले होते. हे डावपेच आता पाकिस्तानवरच उलटले आहेत. अशा परिस्थितीत भारताबरोबर शांतता प्रस्थापित करणे ही पाकिस्तानची गरज बनलेली आहे. तसेच पाकिस्तानची अर्थव्यवस्था गाळात बुडाली आहे. भारताबरोबर सहकार्य प्रस्थापित केल्याखेरीज आपल्या देशात आर्थिक स्थैर्य प्रस्थापित होणार नाही, याची सुस्पष्ट जाणीवही पाकिस्तानला होत आहे. भारताचा विकास, आर्थिक घोडदौड आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढता प्रभाव, याकडे आशाळभूतपणे पाहणारी पकिस्तानी जनता आपला देश इतका मागासलेला का राहिला, असे प्रश्न विचारत आहेत. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते इम्रान खान यांनीही हाच प्रश्न विचारून भारताच्या परराष्ट्र धोरणाची प्रशंसा केली होती.

या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताशी चर्चेसाठी दाखविलेली उत्सुकता ही स्वाभाविक बाब ठरते. मात्र काही दिवसांपूर्वीच, भारत व पाकिस्तानमधील अघोषित राजनैतिक चर्चा अपयशी ठरल्याच्या बातम्या आल्या होत्या. पाकिस्तानच्याच वर्तमानपत्राने तसे वृत्त दिले होते. काश्मीरच्या प्रश्नावर दोन्ही देश तडजोड करायला तयार नसल्याने ही चर्चा अपयशी ठरल्याचे या वर्तमानपत्राने म्हटले होते. अशा परिस्थितीत दोन्ही देशांमध्ये चर्चेचा आणखी एक प्रयत्न यशस्वी ठरण्याची सध्या तरी शक्यता नाही.

भारताबरोबर चर्चा हवी असेल, तर आधी पाकिस्तानने दहशतवादाचा मार्ग सोडावा, अशी भारताची प्रमुख मागणी आहे. तसेच काश्मीरचा प्रश्न आपल्या बाजूने सुटावा, हा पाकिस्तानचा हट्ट भारत मान्य करायला अजिबात तयार नाही. सतत युद्धाच्या किंवा अणुयुद्धाच्या धमक्या देऊनही भारत काश्मीरच्या प्रश्नावर चर्चा करायला तयार होत नाही, उलट भारताचे नेते आता पाकिस्तानव्याप्त काश्मीर मिळविण्याची भाषा बोलू लागले आहेत. पाकिस्तानव्याप्त काश्मीरची जनता व इथले काही नेते पाकिस्तानमुळे आपला भूभाग मागासलेला राहिला, अशी टीका उघडपणे करू लागले आहेत. यासाठीही पाकिस्तानला भारताशी चर्चा करणे आवश्यक असल्याचे वाटत असावे.

मात्र पाकिस्तानच्या इच्छेनुसार भारत शांती किंवा युद्ध पेटू देणार नाही. काय आणि कसे करायचे याचा निर्णय यापुढे भारतच घेईल, असे सूचक उद्गार काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी काढले होते. हीच भारताची पाकिस्तानबाबतची भूमिका असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

leave a reply