पाकिस्तानकडून तालिबान, तेहरिक व बलोच गटांविरोधात कारवाईचा इशारा

Bilawalन्यूयॉर्क/इस्लामाबाद – अफगाणिस्तानातील तालिबान आपले बांधव असल्याचे सांगून गेले वर्षभर तालिबानच्या राजवटीला आंतरराष्ट्रीय समुदायाने मान्यता द्यावी, अशी मागणी पाकिस्तान करीत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ड्युरंड सीमेवर आपल्या जवानांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे बेचैन झालेल्या पाकिस्तानने आता अफगाणिस्तानात घुसून ‘तेहरिक-ए-तालिबान’ व ‘बलोच लिबरेशन आर्मी’ या दोन्ही संघटनांविरोधात कारवाईची धमकी दिली. त्याचबरोबर तालिबानबरोबरच्या संबंधांबाबत फेरविचार करण्याचा इशारा पाकिस्तानने दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीला संबोधित करताना अफगाणिस्तानच्या सीमाभागातून पाकिस्तानवर सुरू असलेल्या हल्ल्यांवर टीका केली. ‘तेहरिक-ए-तालिबान’-टीटीपी व ‘बलोचिस्तान लिबरेशन आर्मी’-बीएलए या दोन दहशतवादी संघटना या हल्ल्यांमागे असल्याचा आरोप बिलावल यांनी केला. अफगाणिस्तानातून पाकिस्तानवर होणारे हल्ले रोखले नाही तर तालिबानबरोबरच्या धोरणात्मक सहकार्यावर फेरविचार केला जाईल, असे बिलावल यांनी बजावले.

pakistan talibanगेल्या काही दिवसांपासून स्पिन बोल्दाक-चमन तसेच कुनार, वझिरिस्तानच्या सीमेवर पाकिस्तानी जवानांवरील हल्ले वाढले आहेत. पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’च्या एजंट्सची दिवसाढवळ्या हत्या केली जात आहे. यावर संताप व्यक्त करून पाकिस्तानने इस्लामाबाद येथील तालिबानच्या राजनैतिक अधिकाऱ्याला समन्स बजावले आहेत. पण तेहरिक, बीएलएबरोबरच पाकिस्तानातील इतर दहशतवादी संघटनांनी देखील या देशाच्या लष्कराविरोधात संघर्ष पुकारला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या चिंता वाढल्या असून येत्या काळात इराणच्या सीमेवरुनही पाकिस्तानला नवे आव्हान मिळू शकते, असा इशारा या देशातील पत्रकार देत आहेत.

दरम्यान, अमेरिकेच्या सेंट्रल कमांड-सेंटकॉमचे प्रमुख लेफ्टनंट जनरल कुरिला यांनी नुकतीच पाकिस्तानचा दौरा करून दहशतवादविरोधात पाकिस्तान चांगले योगदान देत असल्याचे सेंटकॉमचे प्रमुख म्हणाले. कुरिला यांच्या या दौऱ्याबाबत पाकिस्तानी माध्यमांनी अतिशय गोपनीयता राखली आहे. पण अमेरिकेतील माध्यमे व विश्लेषक पाकिस्तानची कड घेत आहेत. तालिबान फक्त पाकिस्तानचीच नाही तर अमेरिकेचीही समस्या असल्याचे सांगून अफगाणिस्तानातील नव्या लष्करी कारवाईचे संकेत अमेरिकी विश्लेषक देत आहेत.

leave a reply