पाकिस्तानावर श्रीलंकेसारखे आर्थिक संकट ओढावेल

-पाकिस्तानच्या व्यावसायिकांचा इशारा

लाहोर/कराची – पाकिस्तानी चलन डॉलरच्या तुलनेत 230 रुपयांवर पोहोचले असून वेळीच उपाययोजना आखल्या नाही तर पाकिस्तानवर देखील श्रीलंकेसारखे आर्थिक संकट ओढावेल, असा इशारा पाकिस्तानी व्यावसायिकांच्या संघटनेने दिला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला नवे कर्ज देण्याआधी नव्या शर्ती समोर ठेवल्या आहेत. चीन तसेच सौदी अरेबियाने दिलेल्या कर्जाचे तपशील जाहीर करण्याची मागणी नाणेनिधीने केली. तर दुसरीकडे चीनने पाकिस्तानकडे तातडीने 86 अब्ज डॉलर्सच्या कर्जाची परतफेड करण्याचा तगादा लावला आहे. यामुळे हवालदिल झालेले पाकिस्तानी व्यावसायिक आपल्या सरकारला इशारे देत आहेत.

pak-crisisपाकिस्तानातील राजकीय अस्थैर्य या देशाच्या आर्थिक संकटात भर टाकत आहे. गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानच्या चलनाची घसरण सातत्याने सुरू होती. चीनकडून कर्ज घेऊन पाकिस्तानच्या सरकारने अर्थव्यवस्था सावरण्याचा प्रयत्न केला. पण गेल्या काही आठवड्यांमध्ये पाकिस्तानी चलनाचे अवमुल्यन विक्रमी स्तरावर पोहोचले असून महागाईने या देशाची जनता आक्रोश करीत आहे. दोन आठवड्यांपूर्वी एका डॉलरमार्गे 200 पाकिस्तानी रुपये मोजावे लागत होते. पण शुक्रवारी हेच दर 230 रुपयांजवळ पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी ‘फिच’मुळे आपल्या चलनाची ही घसरण झाल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमे करीत आहेत. तर पाकिस्तानातील राजकीय अस्थैर्य चलनाच्या घसरणीमागील मुख्य कारण असल्याचे पाकिस्तानातील वरिष्ठ पत्रकार सांगत आहेत.

देशातील या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर, ‘फेडरेशन ऑफ पाकिस्तान चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री-एफपीसीसीआय’ या व्यापारी संघटनेने पेट्रोलियम उत्पादनांवरील करांबाबत कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे बजावले. अन्यथा आपला देशही श्रीलंकेसारख्या आर्थिक संकटापासून दूर नसल्याचा इशारा पाकिस्तानच्या व्यावसायिकांच्या संघटनेने दिला. तसेच पाकिस्तानकडे दोन महिन्यांसाठी तग धरील इतकी परकीय गंगाजळी नसल्याची जाणीव या संघटनेने करुन दिली.

त्यातच हिमालयापेक्षाही उंच आणि समुद्रापेक्षाही खोल मैत्री असलेल्या चीनने पाकिस्तानकडे कर्जाच्या परतफेडीची मागणी केली आहे. ‘चायना हुआनेग’ या कंपनीने पाकिस्तानच्या वीज कंपनीकडे 86 अब्ज डॉलर्सची परतफेड करण्याबाबत विचारणा केली आहे. यासाठी सदर कंपनीने 30 दिवसांची मुदत दिली आहे. पाकिस्तानच्या सरकारसाठी हे नवे संकट ठरते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात झालेल्या निवडणुकीत माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाला विजय मिळाला आहे. विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर नाखूश असलेल्या चीननेच पंजाबमधील निवडणुकीत घोटाळे करून इम्रान खान यांना जिंकवून दिल्याचा आरोप पाकिस्तानी माध्यमे करूलागली आहेत. शाहबाज शरीफ यांचे सरकार अमेरिकेशी जवळीक साधत असल्यामुळे चीनने हा डाव खेळल्याचा दावा माध्यमे करीतआहेत.

तर या विजयामुळे आत्मविश्वास वाढलेल्या इम्रान खान यांनी पाकिस्तानी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना त्वरीत राजीनामा देण्याची सूचना केली आहे. ‘अन्यथा श्रीलंकेप्रमाणे पाकिस्तानी जनतेने सरकार उलथले तर त्याला मी जबाबदार नसेन’, अशी धमकीच माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे.

leave a reply