निर्वासितांच्या मुद्यावर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा बायडेन प्रशासनाला दणका

refugee-issueवॉशिंग्टन – अमेरिकेत घुसणाऱ्या अवैध निर्वासितांना मोकळे रान देणाऱ्या बायडेन प्रशासनाला सर्वोच्च न्यायालयाने जबरदस्त दणका दिला आहे. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी देशातून हद्दपार करण्यात येणाऱ्या निर्वासितांच्या संख्येवर मर्यादा आणण्यासाठी नवे धोरण जाहीर केले होते. मात्र या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येऊ नये, असा आदेश अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. निर्वासितांच्या मुद्यावर बायडेन प्रशासनाची न्यायालयात नाचक्की होण्याची महिन्याभरातील ही दुसरी वेळ ठरते.

Biden-administrationबायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर एकापाठोपाठ बेकायदा निर्वासितांना मोकळीक देणारे निर्णय घेण्यास सुरुवात केली होती. ट्रम्प यांचे निर्वासितांसंदर्भातील धोरण अमेरिकेला काळिमा फासणारे होते असा ठपकाही बायडेन यांनी ठेवला होता. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी निर्वासितांचे लोंढे रोखण्यासाठी लागू केलेली ‘रिमेन इन मेक्सिको’ व ‘टायटल 42′ सारखी धोरणे बायडेन यांनी रद्द केली होती. त्याचवेळी अमेरिकेत राहणाऱ्या एक कोटींहून अधिक बेकायदा निर्वासितांना नागरिकत्व देण्यासाठी नवे विधेयकही बायडेन प्रशासनाने संसदेत सादर केले होते.

US-Supreme-Courtमात्र बायडेन यांच्या या निर्णयांना न्यायालयात सातत्याने आव्हान देण्यात येत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने ‘रिमेन इन मेक्सिको पॉलिसी’ची पुन्हा अंमलबजावणी करा, असे आदेश दिले होते. त्यानंतर ‘टायटल 42′ विरोधातील बायडेन यांचा आदेशही कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. आता तिसऱ्या धोरणात्मक निर्णयालाही सर्वोच्च न्यायालयाचा दणका बसला आहे.

बायडेन प्रशासनाने गेल्या वर्षी एक आदेश काढून अंतर्गत सुरक्षा विभागाला सर्वच बेकायदा निर्वासितांना देशाबाहेर हद्दपार करण्यापासून रोखले होते. फक्त धोकादायक व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या निर्वासितांना देशाबाहेर काढण्यास प्राधान्य द्यावे, असे आदेशात सांगण्यात आले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. यासंदर्भातील पुढील सुनावणी डिसेंबर महिन्यात घेण्यात येईल, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले.

माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेत आलेल्या तसेच घुसखोरी करणाऱ्या निर्वासितांविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली होती. मेक्सिको सीमेवरून घुसखोरी करणाऱ्या निर्वासितांना रोखण्यासाठी ‘मेक्सिको वॉल’च्या उभारणीबरोबरच ‘रिमेन इन मेक्सिको’सारखे धोरणही राबविले होते. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे सीमेवरून घुसखोरी करणाऱ्या निर्वासितांच्या संख्येत मोठी घट दिसून आली होती. मात्र राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या कारकिर्दीत जवळपास 10 लाखांहून अधिक अवैध निर्वासित अमेरिकेत घुसल्याचे विविध अहवालांवरून समोर आले आहे.

leave a reply