अफगाणिस्तानात पाकिस्तानला हस्तक्षेप करू दिला जाणार नाही

- तालिबानच्या प्रवक्त्याची ग्वाही

पाकिस्तानला हस्तक्षेपइस्लामाबाद – पाकिस्तानसह दुसर्‍या कुठल्याही देशाला अफगाणिस्तानात हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली जाणार नाही, अशी घोषणा तालिबानच्या प्रवक्त्याने केली. पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आयएसआय’चे प्रमुख फैज हमीद यांनी काबुलमध्ये जाऊन तालिबानच्या नेत्यांची भेट?घेतली होती. अफगाणिस्तानच्या सरकारमध्ये आपल्या हक्कानी गटाचे वर्चस्व असावे, यासाठी आयएसआयच्या प्रमुखांचा हा दौरा आयोजित करण्यात आला होता, अशी चर्चा आहे. अशा परिस्थितीत तालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने पुन्हा एकदा तालिबान पाकिस्तानच्या तालावर नाचणार नाही, असे सांगून भारताला आश्‍वस्त करण्याचा प्रयत्न केला.

सध्या तालिबानमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. कतारची राजधानी दोहा येथील आपल्या कार्यालयामार्फत अमेरिका व इतर देशांशी वाटाघाटी करणारा तालिबानमधला गट, आंतरराष्ट्रीय मान्यतेसाठी धडपडत आहे. या गटाचा प्रभाव असलेले सरकार अफगाणिस्तानात आले, तर या देशाला आंतरराष्ट्रीय सहाय्य मिळविणे सोपे जाईल. अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेलाही याचा थोडाफार लाभ मिळू शकतो. तर दुसर्‍या बाजूला तालिबानमधला कट्टरवादी गट सत्तेवर आला, तर आंतरराष्ट्रीय मान्यतेची शक्यता निकालात निघेल. याने अफगाणी जनतेला भयंकर परिस्थितीचा सामना करावा लागेल. पण पाकिस्तानला मात्र आपल्याशी एकनिष्ठ असलेल्या या गटाचे सरकार अफगाणिस्तानात हवे आहे.

यासाठी पाकिस्तान तालिबानला मान्यता मिळवून देण्यासाठी धडपडत आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यासाठी काही देशांशी थेट चर्चा केली होती. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी तर तालिबानला मान्यता न मिळाल्यास ९/११ सारख्या दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याचे धमकावले होते. तालिबानला मान्यता मिळवून देण्यात आपला फार मोठा वाटा असल्याचे दाखवून पाकिस्तान अफगाणिस्तानवरील आपले वर्चस्व प्रस्थापित करू पाहत आहे. याची जाणीव तालिबानमधल्या मुल्ला बरादर तसेच इतर गटांना झाल्याचे संकेत मिळत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर, तालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने पाकिस्तानला अफगाणिस्तानात हस्तक्षेप करू दिला जाणार नाही, असे पुन्हा एकदा जाहीर करून टाकले. याआधी तालिबानमधला पाकिस्तानचाच प्रबळ गट असणार्‍या हक्कानी नेटवर्कचा नेता अनस हक्कानी यानेही अफगाणिस्तानचा भारताच्या विरोधात वापर होणार नाही, असे आश्‍वासन दिले होते. पण भारताने याकडे अत्यंत सावधपणे पाहण्याचे धोरण स्वीकारले आहे. पुढच्या काळात अफगाणिस्तानात कशा स्वरुपाचे सरकार प्रस्थापित होते, यावर आपली भूमिका अवलंबून असेल, असे संकेत भारताने दिले आहेत. विश्‍लेषक देखील भारताने आत्ताच अफगाणिस्तानबाबत कुठल्याही स्वरुपाची भूमिका घेणे चुकीचे ठरेल, असे भारताच्या सरकारला बजावले होते.

leave a reply