पाकिस्तानचे अफगाणिस्तानवरील हल्ले सहन करणार नाही

- तालिबानची पाकिस्तानला धमकी

काबुल – ‘यापुढे पाकिस्तानचे अफगाणिस्तानातील हल्ले अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत’, अशी धमकी तालिबानच्या राजवटीचा हंगामी संरक्षणमंत्री मुल्ला याकूब याने दिली. पाकिस्तान सरकारने दिलेल्या इशाऱ्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानच्या सीमेवरील दहशतवाद्यांना मागे घेण्यास सुरुवात केली आहे, असा दावा पाकिस्तानी माध्यमे करीत आहेत. पण तालिबानने पाकिस्तानला धमकी देऊन ड्युरंड लाईनवरील नव्या संघर्षाचे संकेत दिले आहेत.

गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या हवाईदलाने अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसखोरी करून कुनार आणि खोस्त या दोन प्रांतात हल्ले चढविले होते. यापैकी खोस्त प्रांताच्या स्पेरा जिल्ह्यातील कारवाईत 47 जण ठार झाले होते. तालिबानने पाकिस्तानच्या या हवाई हल्ल्यावर टीका केली. तसेच पाकिस्तानच्या लष्कराने अफगाणी नागरिकांचा बळी घेतल्याचा ठपका ठेवला होता. आमच्या हद्दीतघुसून पाकिस्तानने चढविलेले हल्ले अफगाणिस्तान तसेच आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन ठरतात, याची आठवण तालिबानने करून दिली होती.

यानंतर अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवर तणाव निर्माण झाला होता. तालिबानच्या वरिष्ठ कमांडर्सनी पाकिस्तानला गंभीर परिणामांचा इशारा दिला होता. दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या उत्तर वझिरीस्तानात ‘तेहरिक-ए-तालिबान‘ने पाकिस्तानी लष्करावर हल्ला चढविला होता. यामध्ये तीन जवान ठार झाल्याचे पाकिस्तानी लष्कराने म्हटले होते. पण तेहरिकच्या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराला याहूनही अधिक जीवितहानी सोसावी लागली, अशी माहिती माध्यमे देत आहेत.

पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान शाहबाझ शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्या वझिरीस्तान दौऱ्यानंतर हा हल्ला झाला होता. यानंतर पाकिस्तानने तालिबानला सीमेवरील दहशतवाद्यांना मागे घेण्याची सूचना केली. तालिबानने ही मागणी मान्य केल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला. तालिबानने माघार घेऊन तेहरिक व इतर दहशतवादी संघटनाना दुसऱ्या भागात हलविल्याचे पाकिस्तानी माध्यमांचे म्हणणे आहे.

पण तालिबानचा हंगामी संरक्षणमंत्री याकूब याने जाहीरपणे धमकी देऊन पाकिस्तानी माध्यमांच्या दाव्यातील हवा काढून घेतली. ‘अफगाणिस्तानला आजही जगाच्या आणि शेजारी देशांच्या मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. पाकिस्तानने खोस्त आणि कुनार प्रांतात केलेली घुसखोरी याचे उदाहरण ठरते. अफगाणिस्तानचे हित लक्षात घेऊन आधीचे हल्ले खपवून घेतले. पण यापुढे पाकिस्तानचे अफगाणिस्तानवरील हल्ले अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत’, असा इशारा मुल्ला मोहम्मद याकूबने दिला.

‘पाकिस्तानने अफगाणी जनतेच्या संयमाची परिक्षा घेऊ नये. अन्यथा पुढील गंभीर परिणामांसाठी तयार रहावे’,अशी धमकी तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिद याने दिली. तालिबानने पाकिस्तानच्या सीमेजवळ तोफा व लष्करी वाहने तैनात केल्याचे व्हिडिओ याआधी प्रसिद्ध झाले होते. त्याचबरोबर तालिबानने शत्रूच्या विरोधात हवाई हल्ल्यासाठी आपले हेलिकॉप्टर्स व ड्रोन्सची तयारी असल्याचे तालिबानने जाहीर केले होते. अशा परिस्थितीत, तालिबानने पाकिस्तानला दिलेल्या या धमकीचे गांभीर्य वाढले आहे.

leave a reply