कराचीतील हल्ल्यानंतर चीनकडून पाकिस्तानात लष्करी कारवाईचे इशारे

बीजिंग/कराची – पाकिस्तानच्या कराचीमध्ये चीनच्या नागरिकांना लक्ष्य करून घडविलेल्या हल्ल्यावर चीनने तीव्र प्रतिक्रिया दिली. या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना याची जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला. तर चीनच्या सरकारी मुखपत्राने यासाठी पाकिस्तानातील बलोच बंडखोरांच्या ठिकाणांवर हवाई हल्ले चढविण्याची मागणी केली. दरम्यान, बलोच बंडखोर संघटनेतील ‘माजिद ब्रिगेड’ने चीनला उद्देशून नवा इशारा प्रसिद्ध केला. बलोचिस्तानवर ताबा असणाऱ्या पाकिस्तानला सहाय्य करण्याचे आणि बलोचिस्तानची लूट करणारे प्रकल्प राबविण्याचे त्वरीत थांबविले नाही, तर येत्या काळात चीनवर याहून भीषण हल्ले चढवू, असे माजिद ब्रिगेडने धमकावले आहे.

मंगळवारी दुपारी पाकिस्तानच्या कराची विद्यापीठातील मुख्य द्वाराजवळ आत्मघाती हल्लेखोराने घडविलेल्या स्फोटात चार जण ठार झाले. यामध्ये चीनच्या ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्युट’च्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. यानंतर चीनच्या दूतावासाने केलेल्या मागणीनुसार, पाकिस्तान सरकारने पुढच्या काही तासात चिनी नागरिकांच्या सुरक्षेत दुपटीने वाढ केल्याच्या बातम्या येत आहेत.

पण चीनची कम्युनिस्ट राजवट कराचीतील स्फोटावर अधिक आक्रमक बनली आहे. ‘पुन्हा एकदा चीनच्या नागरिकांना लक्ष्य करून हे हल्ले चढविण्यात आले आहेत. हा हल्ला म्हणजे अतिशय गंभीर आणि नीच पातळीवरील गुन्हा ठरतो. पण या स्फोटात बळी गेलेल्या चिनी नागरिकांचे रक्त वाया जाऊ देणार नाही. आपल्या नागरिकांच्या हत्येसाठी जबाबदार असणाऱ्यांना लवकरच याची किंमत मोजावी लागेल’, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने फटकारले.

.तर चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने कराचीतील स्फोटासाठी जबाबदार असणाऱ्या ‘बलोच लिबरेशन आर्मी-बीएलए’ला संपविण्याची घोषणा केली. यासाठी चीनच्या लष्कराने पाकिस्तानातील बीएलएच्या ठिकाणांवर हवाई हल्ले चढवावे, असा सल्ला चीनच्या मुखपत्राने दिला आहे. तसेच बलोच बंडखोरांवरील कारवाईसाठी चीन आपल्या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना रवाना करणार असल्याचे दावे केले जातात.

चीनकडून लष्करी कारवाईचे इशारे दिले जात असताना बलोच बंडखोरांनी देखील चीनला खणखणीत इशारा दिला. “चीनच्या आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय विस्तारवादाचे प्रतिक असणाऱ्या ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्युट’चे संचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य करून आम्ही चीनला सुस्पष्ट संदेश दिला आहे. यापुढे बलोचिस्तानातील चीनचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. बलोचांचा वंशसंहार करणाऱ्या पाकिस्तानला लष्करी आणि आर्थिक सहाय्य करू नका. बलोचिस्तानच्या संपत्तीची लूट करू नका, हे याआधीही आम्ही बजावले होते. यापुढेही चीनने बलोचिस्तानातील आपल्या कारवाया थांबविल्या नाही तर येत्या काळात याहून भीषण हल्ले चढवू”, असे माजिद ब्रिगेडचा प्रवक्ता जियांद बलोच याने बजावले आहे.

आत्तापर्यंत बलोच बंडखोरांनी बलोचिस्तानमधील प्रकल्पांवर काम करणाऱ्या चिनी अधिकारी व नागरिकांना लक्ष्य केले होते. पण कराचीतील स्फोटानंतर बलोच बंडखोरांनी पाकिस्तानच्या मुख्य शहरांपर्यंत धडक मारलेली आहे, याकडे पाकिस्तानातील वरिष्ठ पत्रकार लक्ष वेधत आहेत. तसेच चीनची पाकिस्तानातील गुंतवणूक यापुढे सुरक्षित नसेल, असा इशारा बलोच बंडखोरांनी या हल्ल्याद्वारे दिल्याची चिंता हे वरिष्ठ पत्रकार व्यक्त करीत आहे.

leave a reply