भारताबरोबरील मैत्रीचा पुरस्कार करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराचा पत्रकारांवर दबाव

- पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार हमीद मीर यांचा आरोप

इस्लामाबाद – जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 पुन्हा लागू करण्याचा निर्णय भारताने घेतला, तर पाकिस्तान भारताशी चर्चा करील, अशी घोषणा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केली आहे. पण प्रत्यक्षात भारताशी चर्चा करून सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानचे सरकार व लष्कर जीवाचे रान करीत असल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानचे लष्करच माध्यमांना भारताबरोबरील मैत्रीचा पुरस्कार करणार्‍या बातम्या देण्याची सूचना करीत आहे, असा गौप्यस्फोट पाकिस्तानचे विख्यात पत्रकार हमीद मीर यांनी केला.

पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आयएसआय’च्या तीनजणांनी पत्रकार असद अली तूर यांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला चढविला होता. त्यांना मारहाण करून या तीनजणांनी तूर यांना बदमानी करण्याच्या धमक्याही दिल्या. याआधीही पाकिस्तानचे लष्कर व आयएसआयने मिळून पत्रकारांचे अपहरण, हल्ले चढविल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यामुळे संतापलेल्या पत्रकारांनी कराचीमध्ये निदर्शने केली. ज्येष्ठ पत्रकार हमीद मीर यांनी हा हल्ला चढविणार्‍या आयएसआय व पाकिस्तानी लष्करावर तोफ डागली.भारताबरोबरील मैत्रीचा पुरस्कार करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराचा पत्रकारांवर दबाव - पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार हमीद मीर यांचा आरोप

आमच्या रणगाड्यांना जंग लागलेला आहे. सध्या भारताबरोबर युद्ध करण्यासारखी स्थिती नाही. त्यामुळे तुम्ही भारताबरोबर सहकार्य व मैत्रीचा पुरस्कार करणार्‍या बातम्या द्या, असे पाकिस्तानच्या लष्कराकडून पत्रकारांना सांगितले जाते. ते ऐकत नाही, यासाठी आम्हाला लक्ष्य केले जात आहे, अशी जळजळीत टीका हमीद मीर यांनी यावेळी केली. इतकेच नाही तर वरकरणी इस्रायलच्या विरोधात गरळ ओकणार्‍या पाकिस्तानच्या लष्कराला प्रत्यक्षात इस्रायलशी संबंध प्रस्थापित करायचे आहेत, असा गौप्यस्फोटही यावेळी मीर यांनी केला. पुढच्या काळात पत्रकारांवर घरात घुसून असे हल्ले झाले, तर आमच्याकडे तुमच्या घरात घुसून हल्ले चढविण्यासाठी शस्त्रे नसतील. पण तुमच्या घरातील माहिती आम्ही जगजाहीर करून टाकू. तुमच्या पत्नीने तुमच्यावर गोळ्या का झाडल्या, याची माहिती जगाला देऊ, असा इशारा हमीद मीर यांनी दिला. हा इशारा पाकिस्तानच्या एका विशिष्ट लष्करी अधिकार्‍याला उद्देशून होता का, ते स्पष्ट झाले नाही. पण पाकिस्तानी लष्कराकडे लपविण्यासारखे बरेच काही आहे, जे जगासमोर आल्यास तोंड दाखविणे अवघड बनेल, असे संकेत याद्वारे हमीद मीर यांनी दिले आहेत.

संतापाच्या भरात हमीद मीर यांनी दिलेल्या या इशार्‍यामुळे पाकिस्तानच्या लष्कराची अवस्था जगासमोर आलेली आहे. काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर गोळीबार करून दहशतवादी भारतात घुसविण्याचे चिथावणीखोर प्रयत्न करणार्‍या पाकिस्तानच्या लष्कराने भारताबरोबर संघर्षबंदी लागू करण्याचा निर्णय?घेतला आहे. त्याचवेळी मतभेद गाडून उज्ज्वल भविष्यासाठी सहकार्य प्रस्थापित करण्याचे आवाहन पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी भारताला केले होते.

पाकिस्तानच्या सरकारने यासाठी पुढाकार घ्यावा, अशी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांची अपेक्षा होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताकडून साखर व कापूस आयात करण्याचा प्रस्ताव मांडून या दिशेने प्रयत्नही केले होते. पण त्याला कट्टरपंथियांकडून विरोध झाल्यानंतर, पाकिस्तानच्या पंतप्रधानांना हा निर्णय मागे घ्यावा लागला होता. हे प्रकरण अतिशय चुकीच्या पद्धतीने हातळल्यामुळे पंतप्रधान इम्रान?खान यांच्यावर पाकिस्तानचे लष्कर नाराज असल्याचे दावे केले जातात. त्या पार्श्‍वभूमीवर, पाकिस्तानच्या लष्करालाच आता भारताबरोबर शांतता प्रस्थापित करण्याची गरज वाटत आहे व त्यासाठी माध्यमांवर दबाव टाकला जात आहे, या मीर यांनी केलेल्या आरोपांना दुजोरा मिळत आहे.

leave a reply