चिनी कामगारांकडून पाकिस्तानी जवानांना मारहाण

- पाकिस्तानात चीनविरोधात तीव्र संताप

इस्लामाबाद – ‘चायना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर’ (सीपीईसी) पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. या प्रकल्पामुळे पाकिस्तान कर्जामध्ये आकंठ बुडाल्याची टीका आधीपासून सुरू होती. त्यातच या प्रकल्पात काम करणार्‍या चिनी कामगारांकडून पाकिस्तानी जवानांनाच चोपल्याची घटना समोर आली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आपल्या जवानांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करुन चिनी कंत्राटदारांना खुश ठेवत असल्यामुळे पाकिस्तानात चीन तसेच पाकिस्तानी लष्कराविरोधात संताप वाढला आहे. चिनी कामगारांकडून पाकिस्तानी जवानांना चोप बसण्याची ही पहिली घटना नाही.

China-Pakistanसीपीईसी’ प्रकल्पाअंतर्गत चिनी कामगारांना सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी पाकिस्तानी लष्करावर आहे. पाकिस्तानात आपल्या कामगारांना लक्ष्य केले जात असल्याची तक्रार करुन चीनने ही सुरक्षा मागून घेतली होती. या पार्श्वभूमीवर चिनी कामगारांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानी जवान तसेच लष्करी वाहने तैनात केली जातात. २१ जुलै रोजी ‘सीपीईसी’ अंतर्गत कराची-पेशावर प्रकल्पावर काम सुरू असताना पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहवालपूर जिल्ह्यात चिनी कामगारांनी पाकिस्तानी जवानांना मारहाण केली. गेले दोन आठवडे पाकिस्तानी लष्कराने सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता. पण चीनच्या या मारहाणीची घटना पाकिस्तानी माध्यमांनीच समोर आणली आहे.

सदर प्रकल्पावर काम करणार्‍या चिनी कामगाराने सर्वात आधी पाकिस्तानी जवानाच्या डोक्यात दोन वेळा मारले. त्याच्या बचावासाठी दुसरा पाकिस्तानी जवान धाव घेत असताना इतर तीन चिनी कामगारांनी त्यालाही जबर मारहाण केली. यामध्ये दोन्ही पाकिस्तानी जवान जबर जखमी झाले होते. या घटनेची वर्दी मेजर शहजाद आणि लेफ्टनंट कर्नल इम्रान कासिम या वरिष्ठांना देण्यात आली होती. पण या दोन्ही अधिकार्‍यांनी पाकिस्तानी जवानांनाच शांत राहण्याचे आणि चिनी कामगारांना प्रतिकार न करण्याचे आदेश दिले. या प्रकल्पाच्या निमित्ताने कर्नल इम्रान यांना चिनी कंत्राटदारांकडून लाखो रुपयांचे पैसे मिळविल्याचा आरोप केला जातो. म्हणूनच त्यांनी आपल्या जवानांनाच दटावल्याचे बोलले जाते. तर मेजर शहजाद यांनी या प्रकरणी चिनी कामगारांना जाब न विचारताच चौकशी पूर्ण केल्याची टीका केली जाते.

China-Pakistanपाकिस्तानी जवानांना चिनी कामगारांकडून झालेली मारहाण ही पहिली घटना नाही. याआधीही चिनी कामगारांनी पाकिस्तानी लष्कर तसेच पोलिसांच्या जवानांना झोडून काढल्याच्या, पाकिस्तानी लष्करी तसेच स्थानिक प्रशासनाचे आदेश धुडकावल्याच्या घटना घडल्या आहेत. पण यापैकी कुठल्याही प्रकरणात चिनी कामगारांवर कारवाई झालेली नाही. याउलट पाकिस्तानी जवानांचा पाणउतारा केल्याचे समोर आले होते. चिनी कामगारांकडून होणारी मारहाण आणि आपल्याच लष्करी अधिकार्‍यांकडून याकडे सुरू असलेले दुर्लक्ष यामुळे पाकिस्तानी जवान तसेच जनतेमध्ये नाराजी वाढत असल्याचा दावा केला जातो. अशीच परिस्थिती राहिली तर पाकिस्तानी जवान वरिष्ठ अधिकारी व चिनी कंत्राटदारांविरोधात उठाव करू शकतात, असा दावा पाकिस्तानी विश्लेषक करीत आहेत.

दरम्यान, ‘सीपीईसी’ प्रकल्पातील भ्रष्टाचार वाढला असून चिनी प्रकल्प उभे राहण्याआधीच कोसळू लागल्याचे आरोप होऊ लागले आहेत. चिनी उर्जानिर्मिती कंपन्या प्रचंड प्रमाणात वीजेचे बिल आकारत असल्याची टीकाही सुरू आहे. यासाठी पाकिस्तानातील भ्रष्टाचार जबाबदार असल्याचे आरोप पाकिस्तानी माध्यमे करू लागली आहेत. या प्रकल्पाच्या आड चीन पाकिस्तानला गिळंकृत करण्याच्या प्रयत्नात असल्याचा इशारा पाकिस्तानातील विश्लेषक देत आहेत.

leave a reply