भारताला व्यापारी सहकार्याचा प्रस्ताव देणार्‍या पाकिस्तानचा यु टर्न

इस्लामाबाद – भारताकडून साखर आणि कापूस खरेदी करून पाकिस्तानची जनता आणि व्यापार्‍यांना दिलासा द्या, अशी मागणी या देशाच्या ‘इकॉनॉमिक कोऑर्डिनेशन कमिटी’ने (ईसीसी) केली होती. पाकिस्तानचे सरकार ही मागणी मान्य करण्याच्या तयारीतही होते. मात्र ‘यु टर्न’ अर्थात घेतलेले निर्णय फिरविण्यासाठी बदनाम असलेल्या पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने याबाबत नवा यु टर्न घेतला. पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने भारताबरोबर व्यापार शक्य नसल्याचे सांगून पुन्हा एकदा काश्मीरचे तुणतुणे वाजविले आहे. यामुळे भारताबरोबरील व्यापार पुन्हा सुरू होईल, या आशेवर असलेल्या पाकिस्तानच्या जनतेची आणि व्यापार्‍यांची घोर निराशा झाली आहे.

पाकिस्तानचे अर्थमंत्री हमाद अझहर यांनी भारताकडून साखर व कापूस खरेदी करण्याचे संकेत दिले होते. पाकिस्तानात साखरेचे दर कडाडले आहेत. यामुळे जनता पंतप्रधान इम्रान?खान यांच्या नावाने खडे फोडत आहे. पाकिस्तानपेक्षा १५ ते २० टक्के कमी दर असलेली भारतातील साखर आयात करणे हा यावरील सर्वोत्तम उपाय ठरतो, असा दावा करून हमाद अझहर यांनी भारतातून सुमारे पाच लाख टन इतकी साखर आयात करण्याची तयारी केली होती. तसेच पाकिस्तानच्या वस्त्रोद्योग क्षेत्राने भारतातून कापूस खरेदी करण्यासाठी आपल्या सरकारकडे परवानगी मागितली होती.

इम्रान?खान यांच्या सरकारने या प्रस्तावाला होकार देण्याची तयारीही केली होती. गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तानचे सरकार व लष्कर देखील भारताबरोबर शांतता प्रस्थापित करण्यासाठी धडपडत आहे. त्यामुळे भारतातून साखर व कापूस आयात करण्याचा निर्णय पाकिस्तानी सरकारच्या या प्रयत्नांशी सुसंगत असलेली बाब मानली जात होती. पण यावर पाकिस्तानातल्या भारतद्वेष्ट्या गटाने जोरदार आक्षेप घेतला. भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० मागे घेतल्याखेरीज पाकिस्तान भारताशी व्यापार करणार नाही, अशी घोषणा पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यावेळी केली होती. त्याचे काय झाले? असा प्रश्‍न विचारून या भारतद्वेष्ट्यांनी सरकारला धारेवर धरले.

भारताने कलम ३७० बाबत निर्णय घेतल्यानंतर, पाकिस्तानच्या सरकारने भारतातील आपला राजदूत मागे बोलावून?घेतला होता. तसेच इतर पातळ्यांवरील संबंधही जवळपास तोडून टाकले होते. आता भारताच्या भूमिकेत बदल झालेला नसताना देखील पाकिस्तानचे सरकार भारताशी कुठल्या आधारावर व्यापार करीत आहे? आधीचे नवाझ शरीफ यांचे सरकार भारताशी सहकार्य वाढवित असताना, त्यांची गद्दार म्हणून संभावना करणारे इम्रान खान आत्ता काय करीत आहेत, अशी प्रश्‍नांची सरबत्ती पाकिस्तानच्या माध्यमांनी सुरू केली होती. त्याचवेळी काही माजी लष्करी अधिकार्‍यांनी तर पाकिस्तानच्या सरकारने काश्मीरच्या प्रश्‍नावर भारतासमोर गुडघे टेकल्याची खंत व्यक्त केली होती.

यामुळे दडपणाखाली येऊन पाकिस्तानच्या सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारताबरोबरील व्यापार सुरू करता येणार नसल्याचे जाहीर करून टाकले. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा महमूद कुरेशी यांनी याची घोषणा केली. मात्र यावेळी भारताच्या विरोधात जहरी टीका करण्याचे कुरेशी यांनी टाळले. ताजिकिस्तानमध्ये झालेल्या हार्ट ऑफ एशिया परिषदेत भारताने पाकिस्तानवर टीका केली नाही, यावर परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी समाधान व्यक्त केले होते. त्यांनाही भारतद्वेष्ट्या गटाने लक्ष्य केले होते. त्यामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीच प्रोत्साहन देऊन वाढविलेला भारतद्वेष आता त्यांच्या भारताबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्याच्या धोरणाआड येत असल्याचे दिसू लागले आहे.

ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आणि अंतर्गत आव्हानांवर मात करून आंतरराष्ट्रीय दडपण कमी करण्यासाठी पाकिस्तानसमोर भारताबरोबर सहकार्य करण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. याची जाणीव झाल्याने पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताशी चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याला पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनीही दुजोरा दिला होता. पण आपणच तीव्र केलेल्या भारतद्वेषाचे परिणाम इम्रान?खान यांना भोगावे लागत आहेत.

कलम ३७०बाबतचा निर्णय मागे घेतल्याखेरीज भारताशी व्यापार नाही, अशी डरकाळी फोडणार्‍या इम्रान खान यांच्या सरकारला २०२० सालच्या मे महिन्यात निमूटपणे भारताकडून औषधे घ्यावी लागली होती. आत्ताही पाकिस्तानात कोरोनाची साथ थैमान घालत असल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानला न मागता भारताकडून कोरोनाची लस हवी आहे. ही लस स्वीकारताना पाकिस्तान भारतासमोर आपल्या शर्ती ठेवायला तयार नाही. पण साखर आणि कापसाबाबत ताठरपणा दाखविणारे पाकिस्तान कोरोनाच्या लसीबाबत तशीच भूमिका घेईल का, असा प्रश्‍न या निमित्ताने समोर आलेला आहे.

leave a reply