पॅलेस्टिनी संघटनांकडून इस्रायलला भयंकर परिणामांची धमकी

Palestinian organizationsतेल अविव/गाझा – पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या सरकारविरोधात लाखो निदर्शक इस्रायलच्या तेल अविवमध्ये रस्त्यावर उतरलेले आहेत. इस्रायलच्या न्यायव्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याची तयारी पंतप्रधान नेत्यान्याहू व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती. मात्र याच्या विरोधात तीव्र आंदोलन उभे राहिल्यानंतर नेत्यान्याहू यांना आपला निर्णय रोखणे भाग पडले होते. त्यानंतरच्या काळातही इस्रायलमधील ही सरकारविरोधी निदर्शने थांबलेली नाहीत. इस्रायलमध्ये सुरू असलेल्या या अंतर्गत संघर्षाचा लाभ घेण्याची तयारी पॅलेस्टिनी संघटनांनी केली आहे. याची दखल घेऊन इस्रायलद्वेष्ट्या पॅलेस्टिनी नेत्यांना संपविण्याची मागणी इस्रायलमध्ये सुरू झाली आहे. याची गंभीर दखल घेऊन पॅलेस्टाईनच्या हमास आणि इस्लामिक जिहाद या संघटनांनी इस्रायलने विचारही केलेला नसेल, अशा भयंकर परिणामांचा इशारा दिला आहे.

हमासच्या राजकीय आघाडीचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता असलेल्या ‘शेख सालेह अल-अरूरी’ याचा काटा काढण्याची तयारी इस्रायल करीत असल्याचे दावे करण्यात येत आहे. पण जर का पॅलेस्टिनी नेत्यांच्या हत्येचे प्रयत्न झाले तर त्याचे भयंकर परिणाम इस्रायलला सहन करावे लागतील. इस्रायलने विचारही केला नसेल असे हल्ले आम्ही चढवू, असा इशारा ‘इस्लामिक जिहाद’चा प्रवक्ता तारिक सालमी याने दिला.

Hazemतर हमासचा प्रवक्ता हाजेम कासेम याने इस्रायल सध्या पॅलेस्टाईनविरोधात कारवाई करण्याच्या स्थितीत नसल्याचे सांगून इस्रायलची खिल्ली उडविली आहे. सध्या आपल्या शत्रूचे दोन्ही हात गुंतलेले असल्याने पॅलेस्टिनींच्या विरोधातील कारवाया कमी झालेल्या आहेत, असा टोला हाजेम कासेम याने लगावला. इस्रायलमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांचा दाखला देऊन यामुळे इस्रायलची शक्ती कमी झाल्याचे हाजेम कासेम याने म्हटले आहे.

दरम्यान, काहीही झाले तरी इस्रायलमधील अंतर्गत संघर्षाचा देशाच्या सुरक्षेवर परिणाम होऊ दिला जाणार नाही. इस्रायलच्या शत्रूंनी याबाबत कुठल्याही भ्रमात राहता कामा नये, असे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी बजावले होते. इस्रायलवर झालेल्या हल्ल्यानंतर गाझापट्टी, सिरियाच्या गोलन सीमेत तसेच हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ले चढवून इस्रायलने त्याला कठोर प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतरच्या काळात इस्रायलमध्ये दहशतवादी संघटनांनी घडविलेल्या घातपाताला प्रत्युत्तर देण्यासाठी याला चिथावणी देणाऱ्या नेत्यांना संपविण्याचे संकेत इस्रायलच्या सरकारने दिले होते. याची दखल घेऊन हमास व इस्लामिक जिहादने इस्रायलला या धमक्या दिल्याचे दिसत आहे.

सध्या इस्रायलमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांमुळे आपल्या देशाची सुरक्षा धोक्यात येत असल्याचा सूर इस्रायली विश्लेषकांनी लावला आहे. पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्या धोरणांना विरोध असला तरी त्यासाठी देशाची सुरक्षा धोक्यात टाकता येत नाही, असे दावे करणारे लेख इस्रायली वर्तमानपत्रांमध्ये येऊ लागले आहेत. तर इराणने या क्षेत्रातील सर्वच इस्रायलविरोधी संघटनांना आपला लढा तीव्र करण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या काळात इस्रायलमध्ये अंतर्गत संघर्ष पेटलेला आहे. त्याचवेळी इस्रायलला अमेरिकेचा पाठिंबा राहिलेला नाही, असा दावा करून इराण हमास, इस्लामिक जिहाद व हिजबुल्लाह या संघटनांना इस्रायलविरोधी कारवाया तीव्र करण्याच्या सूचना उघडपणे देत आहे.

leave a reply