फिलिपाईन्सही चीनच्याविरोधात कृत्रिम बेटे उभारील

- फिलिपाईन्सच्या लष्करप्रमुखांचा इशारा

मनिला – ‘‘चीनने वादग्रस्त सागरी क्षेत्रातील कृत्रिम बेटांची निर्मिती व त्यांचा विस्तार रोखला नाही तर फिलिपाईन्स देखील या क्षेत्रात कृत्रिम बेटांची निर्मिती करील’’, असा इशारा फिलिपाईन्सचे लष्करप्रमुख जनरल सिरिलिटो सोबेयाना यांनी दिला. याशिवाय फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रातील चीनच्या मिलिशिया जहाजांची तैनाती आपल्याला धमकावणारी असल्याचा आरोप करून फिलिपाईन्सने चीनच्या विरोधात राजनैतिक स्तरावर तक्रार केली आहे. दोन दिवसांपूर्वीच फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते यांनी सागरी सार्वभौमत्वाच्या सुरक्षेसाठी चीनविरोधात रक्तरंजित युद्धाखेरीज पर्याय नसल्याची घोषणा केली होती.

फिलिपाईन्सचे लष्करप्रमुख जनरल सोबेयाना यांनी पत्रकारांशी बोलताना चीनवर जोरदार टीका केली. ‘२००२ साली असियान सदस्य देश आणि चीन यांच्यात झालेल्या करारानुसार, साऊथ चायना सीच्या संपूर्ण क्षेत्रातील निर्जन बेटांवर कुठल्याही प्रकारचे लष्करी बांधकाम केले जाणार नसल्याचे मान्य केले होते. फिलिपाईन्सने या कराराचा पूर्ण आदर करून या क्षेत्रात कुठल्याही प्रकारचे बांधकाम केलेले नाही. पण चीनने या क्षेत्रातील निर्जन बेटांचा ताबा घेऊन त्यावर बांधकाम केले. तसेच या क्षेत्रात कृत्रिम बेटेही उभारली’, असा घणाघाती आरोप जनरल सोबेयाना यांनी केला.

‘आता मात्र चीनने या क्षेत्रातील निर्जन बेटांवरील बांधकामाचा विस्तार व नव्या कृत्रिम बेटांची निर्मिती करण्याचे थांबविले नाही तर फिलिपाईन्स देखील तसेच करील. फिलिपाईन्सच्या सरकारने आदेश दिले तर लष्कर देखील या क्षेत्रात कृत्रिम बेटांची निर्मिती करू शकतो’, असे लष्करप्रमुख सोबेयाना यांनी बजावले. चीनच्या तुलनेत फिलिपाईन्सची या क्षेत्रातील तैनाती कमी आहे. पण दुअर्ते सरकारने आवश्यक पाठिंबा दिला तर हे शक्य होईल, असा दावा जनरल सोबेयाना यांनी केला. या महिन्याच्या सुरुवातीलाच लष्करप्रमुख जनरल सोबेयाना यांनी फिलिपाईन्सच्या सागरी हद्दीत चीनने उभारलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याचा आपल्याला अधिकार असल्याचे बजावले होते.

गेल्या महिन्यात दोनशेहून अधिक चीनच्या जहाजांनी आपल्या सागरी हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप फिलिपाईन्स करीत आहे. चीनने हा आरोप फेटाळला असून, साऊथ चायना सीमधील खराब हवामानामुळे आपल्या मच्छिमार जहाजांनी सदर सागरी क्षेत्रात आश्रय घेतल्याचा दावा चीन करीत आहे. पण या जहाजांवर लष्करी प्रशिक्षण घेतलेले चीनचे मिलिशिया तैनात असल्याचा ठपका फिलिपाईन्सच्या लष्कराने ठेवला आहे.

चीनच्या या घुसखोर मिलिशिया जहाजांवर फिलिपाईन्सच्या नौदल व हवाईदलाची दररोज गस्त सुरू आहे. यातील काही जहाजांनी सदर सागरी क्षेत्रातून माघार घेतल्याचा दावा केला जातो. तरी देखील जवळपास दोनशे जहाजे या क्षेत्रात अजूनही तैनात असल्याचा आरोप फिलिपाईन्स करीत आहे. या घुसखोरीच्या विरोधात फिलिपाईन्सचे संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुखांनी चीनवर घणाघाती टीका करून चीनला परिणामांचा इशाराही दिला होता.

दरम्यान, फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांनी आपले सागरी क्षेत्र चीनच्या तावडीतून परत मिळवायचे असेल तर युद्धाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे म्हटले होते. तसेच चीनबरोबर लढले जाणारे हे युद्ध रक्तरंजित असेल आणि यात जय आणि पराजय अशा दोन्ही शक्यता संभवतात, असे राष्ट्राध्यक्ष दुअर्ते म्हणाले होते.

leave a reply