चीनबरोबरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर फिलिपाईन्सने साऊथ चायना सीमध्ये गस्त वाढविली

मनिला – ‘साऊथ चायना सी’मध्ये लष्करी सामर्थ्याच्या बळावर अरेरावी करणार्‍या चीनविरोधात फिलिपाईन्सने अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या तीन महिन्यात फिलिपाईन्सने ‘साऊथ चायना सी’मधील गस्त मोठ्या प्रमाणात वाढविल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. दोन आठवड्यांपूर्वीच फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते यांनी, गस्तीनौका मागे घेणार नसल्याचे ठणकावलेही होते. या पार्श्‍वभूमीवर समोर आलेला अहवाल राष्ट्राध्यक्ष दुअर्ते यांच्या आक्रमक वक्तव्याला पुष्टी देणारा ठरतो.

साऊथ चायना सीमध्ये गस्त

‘एशिया मेरिटाईम ट्रान्स्परन्सी इनिशिएटिव्ह’ या अभ्यासगटाने नवा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, 1 मार्च ते 25 मे या कालावधीत फिलिपाईन्सच्या नौदल व तटरक्षकदलाच्या गस्तीनौकांनी साऊथ चायना सीमधील वादग्रस्त क्षेत्राला 57हून अधिक वेळा भेट दिली. नौदल व तटरक्षकदलाच्या 13 गस्तीनौकांचा या सहभाग होता. 1 मार्चपूर्वी 10 महिन्यांच्या कालावधीत फिलिपिनी नौकांनी फक्त सातवेळा सदर भागात गस्त घातली होती. ही बाब लक्षात घेता चीनच्या कारवायांचा मुकाबला करण्यासाठी फिलिपाईन्स सध्या अधिक आक्रमक झाल्याचे लक्षात येते, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.

फिलिपिनी यंत्रणांकडून घालण्यात आलेली गस्त ‘स्प्राटले आयलंड’ व ‘स्कारबोरो शोल’ या वादग्रस्त भागांमध्ये होती, याकडेही अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. या दोन्ही भागांवर चीनने आपला दावा सांगितला असून ‘स्कारबोरो शोल’ भागात कृत्रिम बेट व तळही उभारला आहे. ही पार्श्‍वभूमी असतानाही फिलिपाईन्सने वाढविलेली गस्त चीनला दिलेले उघड आव्हान असल्याचे दिसत आहे. गस्त वाढविण्यापाठोपाठ राजनैतिक पातळीवरही चीनला लक्ष्य करण्यासाठी फिलिपाईन्सने पावले उचलली आहेत.

साऊथ चायना सीमध्ये गस्त

शनिवारी फिलिपाईन्सच्या परराष्ट्र विभागाने ‘थिटु आयलंड’नजिक चीनच्या वाढत्या कारवायांचा तीव्र निषेध नोंदविला. चीनच्या गस्तीनौका व मच्छिमारी नौकांकडून या क्षेत्रात चाललेल्या कारवायांवर आक्षेप घेऊन त्या ताबडतोब थांबवाव्यात, अशी आग्रही भूमिका परराष्ट्र मंत्रालयाच्या निेवेदनात मांडण्यात आली आहे. त्याचवेळी ‘थिटु आयलंड’ हा फिलिपाईन्सचा सार्वभौम हिस्सा असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच, ‘थिटु आयलंड’वर सुसज्ज ‘मिलिटरी हब’ उभारण्यात येईल, अशी घोषणा फिलिपाईन्सचे लष्करप्रमुख जनरल सिरिलितो सोबेयाना यांनी केली होती.

एकापाठोपाठ घडलेल्या या घटनांनी चीन व फिलिपाईन्समध्ये साऊथ चायना सीच्या मुद्यावर असणारा वाद चांगलाच चिघळल्याचे दिसत आहे. मार्च महिन्यात चीनने आपली शेकडो मच्छिमार जहाजे फिलिपिनी हद्दीत घुसविल्यानंतर फिलिपाईन्समध्ये चीनविरोधात तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यात फिलिपाईन्स सरकार व लष्कराकडून साऊथ चायना सी प्रकरणात सातत्याने आग्रही भूमिका घेऊन चीनला सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे. एप्रिल महिन्यात फिलिपाईन्सने साऊथ चायना सीमध्ये चीनप्रमाणेच कृत्रिम बेटे उभारण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर चीनकडून दरवर्षी लादण्यात येणारी मासेमारीवरील बंदीही फिलिपाईन्सने उघडपणे धुडकावली होती.

leave a reply