डीआर काँगोमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 33 जणांची निर्घृण हत्या

किन्हासा – डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो अर्थात डीआर काँगोमध्ये दहशतवाद्यांनी घडविलेल्या भीषण हत्याकांडात 33 जणांचा बळी गेला. यामध्ये ‘आयएस’ संलग्न दहशतवाद्यांनी युगांडाच्या सीमेजवळ 13 गावकर्‍यांचा शिरच्छेद करून घडविलेल्या भयंकर हत्याकांडाचाही यात समावेश आहे. यानंतर डीआर काँगो आणि युगांडाचे सरकार या दहशतवादी संघटनांविरोधात मोठी लष्करी मोहीम हाती घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

डीआर काँगोमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 33 जणांची निर्घृण हत्या‘अलाईड् डेमोक्रॅटिक फोर्सेस’ (एडीएफ) या दहशतवादी संघटनेने दोन दिवसांपूर्वी डीआर काँगोच्या उत्तरेकडील बेनी या शहराजवळ असलेल्या गावात घुसून हत्याकांड घडविले. या दहशतवाद्यांनी गावातील 22 जणांची निर्घृण हत्या घडविली. यापैकी 13 जणांचा दहशतवाद्यांनी शिरच्छेद केला, असे डीआर काँगोच्या लष्कराने म्हटले आहे. ठार झालेल्यांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. यात एकाच परिवारातील आठ जणांचा समावेश आहे.

या परिवारातील चार महिन्यांच्या बाळाला सोडून त्याच्या सहा भावंडांनाही दहशतवाद्यांनी ठार केले. या मुलांच्या आईचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. एडीएफच्या दहशतवाद्यांनी गावाजवळच्या जंगलात गावकर्‍यांचे मृतदेह फेकून दिले असून बळींची संख्या मोठी असू शकेल, अशी भीती व्यक्त केली जाते. याशिवाय एडीएफच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हिंसाचारात दहा जणांचा बळी गेला आहे. हे भयंकर हत्याकांड घडविणार्‍या ‘एडीएफ’वर ‘आयएस’चा प्रभाव असल्याचा दावा केला जातो. तसेच एडीएफ या संघटनेचा प्रमुख जमील मुकूलू याने ओसामा बिन लादेन जिवंत असताना त्याची भेट घेतली होती. या भेटीनंतर जमीलने डीआर काँगोमध्ये एडीएफ सुरू करून इथले सरकार उधळण्यासाठी दहशतवादी हल्ले सुरू केले होते.डीआर काँगोमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 33 जणांची निर्घृण हत्या

या दहशतवादी संघटनेकडून डीआर काँगोच्या उत्तरेकडील भाग आणि युगांडाची सीमा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हल्ले घडविण्यात येत आहेत. या हल्ल्यांमध्ये साडे तीन हजारांहून अधिकजणांचा बळी घेतल्याचा दावा केला जातो. गेल्या पाच महिन्यात या दहशतवाद्यांनी किमान 500 जणांची हत्या केली. तर या महिन्याच्या सुरुवातीला बेनी येथे घडविलेल्या हत्याकांडात 21 जणांचा बळी गेला होता.

डीआर काँगोमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 33 जणांची निर्घृण हत्याएडीएफच्या या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर, तीन आठवड्यांपूर्वीच डीआर काँगोच्या सरकारने उत्तरेकडील किवू आणि इतूरी भागात मार्शल लॉ लागू केला होता. तर युगांडाच्या सरकारने देखील एडीएफवर कारवाई करण्याचे जाहीर केले होते. यानंतरही एडीएफच्या दहशतवाद्यांनी भीषण हत्याकांड घडविल्यामुळे डीआर काँगो आणि युगांडाच्या सरकारवरील दडपण वाढले आहे.

दरम्यान, मध्य आफ्रिकेतील डीआर काँगो हा देश खनिजसंपत्तीने समृद्ध असलेला देश आहे. कोबाल्ट या धातूचा जगातील सर्वात मोठा उत्पादक देश अशी डीआर काँगोची ओळख आहे. याशिवाय या देशात तांबे आणि हिर्‍याच्या खाणी देखील आहेत. खनिजांच्या उत्खननावर या देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. म्हणूनच दहशतवादी या देशात भयंकर हिंसाचार व अस्थैर्य माजवून आर्थिक पातळीवरही डीआर काँगोला हादरे देण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

leave a reply