अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावरील विषप्रयोगाचा कट उधळला

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर विषप्रयोग करण्याचा कट उधळण्यात आला आहे. ‘रिसिन’ या जहाल विषाचे पॅकेट राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नावाने व्हाईट हाऊसमध्ये पाठविण्यात आले होते. मात्र ‘यूएस सिक्रेट सर्व्हिस’च्या तपासणीत विषारी पॅकेटची माहिती उघड झाली. सदर पॅकेट कॅनडाहून पाठविण्यात आल्याचे समोर आले असून ‘एफबीआय’ने कॅनेडियन यंत्रणांच्या सहाय्याने चौकशी सुरु केल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला अवघा दीड महिना राहिला असतानाच ट्रम्प यांच्यावरील विषप्रयोगाचा कट उघड होणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने पाठविण्यात आलेली सर्व पाकिटे ‘स्क्रिनिंग फॅसिलिटी’मध्ये तपासून मग व्हाईट हाऊसमध्ये धाडण्यात येतात. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांच्या नावाने पाठविण्यात आलेल्या एका टपालात संशयास्पद घटक असल्याचे ‘फायनल ऑफसाईट फॅसिलिटी’मध्ये उघड झाले. एफबीआयने केलेल्या चाचण्यांमधून हा घटक ‘रिसिन’ नावाचे जहाल विष असल्याचे स्पष्ट झाले. पॅकेट कॅनडावरून आल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले असून ‘यूएस सिक्रेट सर्व्हिस’ व ‘एफबीआय’ने कॅनेडियन यंत्रणांसह संयुक्त तपास सुरू केला आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प

गेल्या चार वर्षांत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची हत्या घडविण्याचा हा चौथा कट ठरला असून ‘रिसिन’ विषाचा वापर होण्याची ही दुसरी वेळ आहे. २०१८ साली अमेरिकी नौदलाच्या माजी अधिकाऱ्याने व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्या नावाने ‘रिसिन’ विषाचा समावेश असलेले घटक एका पाकिटातून पाठविले होते. तर गेल्या महिन्यात व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुरू असताना गोळीबार झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण परिसर लॉकडाऊन करण्यात आला होता.

एरंडेलाच्या बियांमध्ये आढळणारे ‘रिसिन’ हे विष अत्यंत घातक असून त्यावर कोणतेही औषध नाही. तोंडावाटे अथवा श्वासातून हे विष शरीरात गेल्यास ३६ ते ७२ तासांमध्ये सदर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. या विषाचा वापर जैविक शस्त्र म्हणून होऊ शकतो, असे इशारेही यापूर्वी विविध यंत्रणांकडून देण्यात आले आहेत.

leave a reply