श्रीमंत देशांमुळे गरीब देश बिकट स्थितीत

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

कैरो – विकसित देशांच्या निर्णयांचे परिणाम इतर देशांना सहन करावे लागतात. विकसित देशांनी अशा निर्णयांची जबाबदारी स्वीकारायला हवी, असे भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विकसित देशांना सुनावले होते. त्यापाठोपाठ परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी देखील श्रीमंत देशांना फटकारले आहेत. आपल्यामुळे गरीब देशांना फटका बसत आहे, याची जाणीव श्रीमंत देशांना राहिलेली नाही. यामुळे सध्याचे जग तणावपूर्ण व असंतुष्ट बनले असून जगाला बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, असे भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे.

S. Jaishankarइजिप्तच्या दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राजधानी कैरोमधील भारतीय समुदायाला संबोधित करताना गरीब देशांमध्ये निर्माण झालेल्या या असंतोषाची जाणीव करून दिली. गरीब देशांचा विचार न करता श्रीमंत देश आपले निर्णय त्यांच्यावर लादत आहेत. यामुळे जगाचे ध्रुवीकरण झाले असून तणाव व असंतोष वाढत आहे. कितीतरी देशांना यामुळे खडतर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशा स्वतंत्र बाणा असलेल्या देशांनी आपल्यावरील या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवावा, असा संदेश यावेळी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला.

याआधीही परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी आपल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात श्रीमंत देशांच्या विरोधात गरीब व विकसनशील देशांमध्ये संतापाची भावना असल्याचे म्हटले होते. या देशांनी संयुक्त राष्ट्रसंघात आपल्याला प्रतिनिधित्त्व मिळत नसल्याची खंतही हे देश व्यक्त करीत असल्याचे जयशंकर यांनी बजावले होते. इजिप्तच्या भेटीतही जयशंकर यांनी पुन्हा एकदा श्रीमंत देशांना याची जाणीव करून दिल्याचे दिसते. दरम्यान, भारत व इजिप्त केवळ व्यापारी सहकार्यावर लक्ष केंद्रीत करीत नाहीत, तर भारताला इजिप्तशी व्यापाराच्या पलिकडे जाणारे द्विपक्षीय सहकार्य विकसित करायचे आहे, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

‘इजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारत व इजिप्तमधील द्विपक्षीय व्यापार ७ अब्ज इतका असल्याचे सांगून दोन्ही देशांची क्षमता लक्षात घेता हा व्यापार खूपच कमी असल्याचे आपल्याला सांगितले होते. माझ्यासोबत इजिप्तमध्ये आलेले शिष्टमंडळ देखील इजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या या दाव्याशी सहमत आहे. पुढच्या काळात दोन्ही देशांमधील हे व्यापारी सहकार्य अधिकच व्यापक करण्यासाठी प्रयत्न केले जातील’, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी म्हटले आहे.

leave a reply