कोरोनाचा अधिक धोकादायक व संसर्गजन्य व्हेरिअंट येण्याची शक्यता

- उद्योजक बिल गेट्स यांचा इशारा

संसर्गजन्यवॉशिंग्टन/लंडन – कोरोनाची साथ अजूनही संपलेली नसून या विषाणूचा अधिक संसर्गजन्य व धोकादायक व्हेरिअंट लवकरच येण्याची शक्यता आहे, असा गंभीर इशारा अमेरिकी उद्योजक बिल गेट्स यांनी दिला. गेल्या काही दिवसात अमेरिका, आफ्रिका, युरोप व चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येवरून जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) चिंता व्यक्त केली होती. त्यापाठोपाठ गेट्स यांनी इशारा दिल्याने कोरोनाची नवी लाट येण्याचे संकेत मिळत आहेत.

गेट्स यांचे ‘हाऊ टू प्रिव्हेंट नेक्स्ट पॅन्डेमिक’ नावाचे नवे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत गेट्स यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटबाबत बजावले. ‘मी काही दुर्दैव आणि विषादाचा प्रतिनिधी बनू इच्छित नाही. पण कोरोनाची साथ व त्यातील सर्वाधिक वाईट काळ आपण अजूनही पाहिलेला नाही. अशी वेळ पुढील कालावधीत येण्याची शक्यता पाच टक्क्यांहून अधिक आहे. आतापर्यंत आलेल्या कोरोना विषाणूच्या व्हेरिअंटमधील सर्वाधिक संसर्गजन्य व धोकादायक ठरु शकेल असा व्हेरिअंट येण्याची शक्यता कायम आहे’, असा इशारा गेट्स यांनी दिला.

यावेळी अमेरिकी उद्योजकांनी भविष्यातील साथ रोखण्यासाठी ‘ग्लोबल एपिडेमिक रिस्पॉन्स ॲण्ड मोबिलायझेशन इनिशिएटिव्ह’ सक्रिय करण्याची गरज असल्याचाही सल्ला दिला. ही योजना ‘डब्ल्यूएचओ’सारखी संस्थाच राबवू शकते आणि त्यासाठी सर्वोत्तम आरोग्यतज्ज्ञांचे पथक व वर्षाला एक अब्ज डॉलर्स निधीची गरज आहे, असेही गेट्स म्हणाले. बिल गेट्स यांनी कोरोना साथीसंदर्भात इशारा देण्याची गेल्या सहा महिन्यातील ही तिसरी वेळ ठरली आहे. डिसेंबर महिन्यात त्यांनी ‘ओमिक्रॉन’ व्हेरिअंटबाबत बजावले होते. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिअंटचा फैलाव हा या साथीतील सर्वात वाईट काळ ठरु शकतो, असे अमेरिकी उद्योजक बिल गेट्स यांनी म्हटले होते.

गेट्स यांच्यापूर्वी ‘डब्ल्यूएचओ’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही कोरोनाच्या नव्या धोक्याकडे लक्ष वेधले आहे. जगातील अनेक देशांमध्ये चाचण्या व इतर प्रतिबंधक उपायांची गती मंदावली आहे व त्यामुळे कोरोनाचा विषाणू पुन्हा थैमान घालू शकतो, असे ‘डब्ल्यूएचओ‘चे प्रमुख टेड्रॉस घेब्रेस्यूस यांनी बजावले आहे. तर वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञ मारिआ केर्खोव्ह यांनी, कोरोनाच्या पुढील व्हेरिअंटबाबत प्रचंड अनिश्चितता असून ही सर्वात मोठी चिंता असल्याची जाणीव करून दिली. आपण अजूनही साथीच्या मधल्या टप्प्यात असून ही जागतिक समस्या आहे, हे लक्षात घ्यायला हवे असेही केर्खोव्ह यांनी म्हटले आहे.

दरम्यान, जगभरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 51 कोटींवर गेली आहे तर दगावणाऱ्यांची संख्या 62 लाखांवर पोहोचली आहे. अमेरिकेत गेल्या काही दिवसांमध्ये प्रतिदिनी आढळणाऱ्या रुग्णांची संख्या 60 हजारांवर पोहोचल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. युरोपातील जर्मनी, फ्रान्स व इटलीतही रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. तर दक्षिण आफ्रिकेत कोरोनाची पाचवी लाट येत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. चीनमध्ये रुग्णांच्या संख्येत हजारोंनी भर पडत असून राजधानी बीजिंगमध्ये ‘मास टेस्टिंग’ मोहीम हाती घेण्यात आल्याचे उघड झाले.

leave a reply