भारतात गुंतवणुकीची संधी न साधल्यास बरेच काही गमावण्याचा धोका

- डेन्मार्कच्या उद्योगक्षेत्राला पंतप्रधान मोदी यांचा संदेश

गमावण्याचा धोकाकोपेनहेगन – भारतात गुंतवणूक केली नाही, तर बरेच काही गमावण्याचा धोका आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी डेन्मार्कच्या उद्योगजगताला बजावले. मंगळवारपासून पंतप्रधानांचा डेन्मार्क दौरा सुरू झाला. डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट्टे फ्रेडरिक्सन यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. त्यांच्याबरोबरील द्विपक्षीय चर्चेत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याबरोबर हरित ऊर्जेसंदर्भातील भागीदारी अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कोरोनाची साथ ओसरल्यानंतर, डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट्टे फ्रेडरिक्सन या भारताला भेट देणाऱ्या पहिल्या विदेशी नेत्या होत्या, याची आठवण पंतप्रधान मोदी यांनी भारतीय समुदायाला संबोधित करताना करून दिली. तर पंतप्रधान फ्रेडरिक्सन यांनी भारत हा डेन्मार्कचा धोरणात्मक भागीदार देश असल्याचे सांगून पुढच्या काळात ही भागीदारी अधिकाधिक विकसित होईल, असा विश्वास व्यक्त केला. त्याच्या आधी इंडिया-डेन्मार्क बिझनेस ग्रूपला संबोधित करताना, पंतप्रधानांनी भारतातील गुंतवणुकीची महत्त्व अधोरेखित केले.

आजच्या काळात सोशल मीडियावर ‘फिअर ऑफ मिसिंग आऊट-एफओएमओ’चा विशेष वापर केला जातो. आत्ताच्या काळात भारतात गुंतवणुकीची संधी साधली नाही, तर बरेच काही गमावण्याची भीती आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारताने हाती घेतलेल्या आर्थिक सुधारणांमुळे फार मोठे बदल होत आहेत. विशेषतः भारतात ग्रीन टेक्नॉलॉजी अर्थात पर्यावरणाशी सुसंगत असलेले हरित तंत्रज्ञान, शीतगृहांची उभारणी, जहाजे व बंदर क्षेत्रातील प्रचंड प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत, याची जाणीव पंतप्रधानांनी करून दिली.

याबरोबर गतीशक्ती कार्यक्रमाच्या अंतर्गत पायाभूत सुविधांचा विकासत करण्यात येत आहे, याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. आधीच्या काळात भारत व डेन्मार्कच्या उद्योगक्षेत्राने एकमेकांच्या सहकार्याने काम केले होते, असे सांगून पुढच्या काळात हे सहकार्य नव्या उंचीवर नेण्याचा संदेश पंतप्रधानांनी दिला. गेल्या वर्षी कोरोनाच्या साथीमुळे भारत व डेन्मार्कमध्ये व्हर्च्युअल पातळीवर चर्चा पार पडली होती. यावेळी इंडिया-डेन्मार्क ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’ची घोषणा करण्यात आली होती. याच्या प्रगतीचा आढावा पंतप्रधानांनी आपल्या या डेन्मार्कच्या दौऱ्यात घेतल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, डेन्मार्कच्या या भेटीबरोबरच पंतप्रधान मोदी दुसऱ्या ‘इंडिया-नॉर्डिक समिट’मध्ये सहभागी होणार आहेत. कोरोनाच्या लाटेनंतर उद्भवलेल्या परिस्थिती, आर्थिक स्थिती रुळावर आणण्यासाठीचे प्रयत्न, जागतिक हवामानबदल, संशोधन व तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा व जागतिक सुरक्षाविषयक स्थिती, या विषयांवर ‘इंडिया-नॉर्डिक समिट’मध्ये चर्चा होईल. या परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आईसलँड, फिनलँड आणि स्वीडन या देशांच्या नेत्यांशी भेट घेऊन द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा करणार आहेत. 2020-21 सालामध्ये भारत व नॉर्डिक देशांमधील व्यापार पाच अब्ज डॉलर्सवर होता. पंतप्रधानांच्या या भेटीनंतर भारताच्या नॉर्डिक देशांबरोबरील व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

leave a reply