रशियाच्या ड्रोनहल्ल्यानंतर युक्रेनच्या ओडेसा शहरातील वीजपुरवठा खंडित

- युक्रेनकडून मेलिटपोल व क्रिमिआत प्रतिहल्ले

वीजपुरवठा खंडितमॉस्को/किव्ह – रशिया व युक्रेन युद्धातील संघर्षाची तीव्रता दिवसेंदिवस अधिक वाढत असल्याचे समोर येत आहे. शनिवारी रशियाने दक्षिण युक्रेनमधील महत्त्वाचे शहर व सामरिक तळ असलेल्या ओडेसाला लक्ष्य केले. या शहरावर केलेल्या ड्रोनहल्ल्यांमुळे वीजपुरवठा खंडित झाला असून 15 लाख नागरिकांवर अंधारात राहण्याची वेळ ओढविली आहे. रशियाच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना युक्रेनी फौजांनी मेलिटपोल व क्रिमिआतील मिलिटरी बरॅक्सवर हल्ले केले असून त्यात जीवितहानी झाल्याचा दावाही करण्यात येत आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून रशियाने युक्रेनची राजधानी किव्हसह प्रमुख शहरे व प्रांतांना क्षेपणास्त्रे तसेच ड्रोन्सहल्ल्यांचे लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती. रशियाकडे क्षेपणास्त्रांचा साठा कमी राहिल्याने रशिया मोठे हल्ले करीत असल्याचे दावे युक्रेन व पाश्चिमात्य आघाडीने केले होते. मात्र जवळपास दोन महिन्यांनंतरही रशियाने क्षेपणास्त्रे व ड्रोन्सच्या सहाय्याने युक्रेनी शहरांवरील हल्ले कायम ठेवत आपली ताकद दाखवून दिली आहे.

वीजपुरवठा खंडितशनिवारी रशियाने ओडेसा तसेच मायकोलव्ह शहरात मोठे ड्रोन हल्ले चढविले. या हल्ल्यांमध्ये वीजपुरवठा केंद्रांसह इतर पायाभूत सुविधा तसेच लष्करी जागांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती रशियन संरक्षण विभागाने दिली. रशियाच्या हल्ल्यांमुळे ओडेसा शहर व नजिकच्या भागातील जवळपास 15 लाख नागरिकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. हल्ल्यांमुळे झालेले नुकसान मोठे असल्याने वीजपुरवठा सुरू करण्यास काही दिवस लागू शकतात, असे युक्रेनी यंत्रणांनी सांगितले. मायकोलेव्ह भागातही पायाभूत सुविधांसह लष्करी ठिकाणांवर हल्ले करण्यात आल्याचे समोर आले आहे. याव्यतिरिक्त डोन्बास क्षेत्रात रशियाकडून तोफा, रणगाडे, रॉकेट्स व मॉटर्सच्या सहाय्याने जोरदार हल्ले होत असल्याची कबुली युक्रेनी यंत्रणांनी दिली.

रशियाच्या या हल्ल्यांना युक्रेनने प्रत्युत्तर दिले आहे. डोनेत्स्क प्रांतातील मेलिटपोल तसेच क्रिमिआमधील लष्करी बरॅक्सना लक्ष्य करण्यात आले. या बरॅक्समध्ये रशियाने नव्याने भरती केलेले जवान तैनात करण्यात आले होते. हल्ल्यांमध्ये बरॅक्सना मोठी आग लागल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले आहेत. या हल्ल्यात रशियाची मोठी जीवितहानी झाल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे.

leave a reply