सौदीच्या चीनबरोबरील सहकार्याचा अर्थ अमेरिकेशी असहकार्य असा होत नाही

- सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांचा खुलासा

अमेरिकेशी असहकार्यरियाध – ‘जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनशी सहकार्य आवश्यक ठरते. याचा अर्थ सौदीने जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेबरोबरील सहकार्य मोडीत काढलेले नाही. प्रत्येक देशाबरोबर सहकार्य प्र्रस्थापित करण्यासाठी सौदी मोकळा आहे’, असा खुलासा सौदी अरेबियाने केला. चीनबरोबर अब्जावधी डॉलर्सचे सहकार्य करार करून सौदीने अमेरिकेला धक्का दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यावर सौदी अरेबियाने हे स्पष्टीकरण दिले आहे.

जून महिन्यात अमेरिकेच्या सेंल कमांडचे प्रमुख जनरल केनिथ मॅकेन्झी यांनी चीन व रशियाला आखातापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्याचबरोबर या क्षेत्रातील अमेरिकेच्या घसरत्या लोकप्रियतेचा फायदा चीन व रशिया घेत असल्याचे मॅकेन्झी यांनी बजावले होते. चीन आपल्या कर्जाचे जाळे, बेल्ट अँड रोड प्रकल्पाचा वापर करून आखातातील आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मॅकेन्झी यांनी केला होता.

अमेरिकेशी असहकार्यदोन दिवसांपूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यामुळे अमेरिकेची ही भीती प्रत्यक्षात उतरू लागली आहे. चीनने सौदीबरोबर 30 अब्ज डॉलर्सचे एकूण 34 सहकार्य करार केले. यामध्ये इंधन, संरक्षण, व्यापार तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याचा समावेश आहे. सौदीच्याच पुढाकाराने ‘अरब-चीन’ आणि ‘आखात-चीन’ अशा दोन मोठ्या बैठका पार पडल्या. यावेळी चीनने अरब देशांबरोबर युआनमध्ये इंधनाचे व्यवहार करण्याचे जाहीर केले.

आत्तापर्यंत सौदी व आखाती देशांवर प्रभाव ठेवून असलेल्या अमेरिकेत जिनपिंग यांच्या दौऱ्यामुळे अस्वस्थता वाढली आहे. सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे जंगी स्वागत केल्याच्या बातम्या अमेरिकेत प्रसिद्ध झाल्या होत्या. बायडेन आणि जिनपिंग यांच्या सौदी दौऱ्याची तुलना सुरू झाली आहे. बायडेन प्रशासनाने यावर थेट प्रतिक्रिया दिली नसली तरी अमेरिकेची माध्यमे तसे संकेत देत आहेत.

अशा परिस्थितीत, सौदीचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल बिन फरहान यांनी चीनबरोबरच्या सहकार्याबाबत खुलासा केला. ‘अमेरिका, भारत, चीन, जपान आणि जर्मनी या देशांबरोबर सौदी अरेबियाचे धोरणात्मक सहकार्य आहे. यापैकी अमेरिका व चीनबरोबरच्या सहकार्यामध्ये सौदीचे समान हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यामुळे अमेरिका व चीन यापैकी एका देशाबरोबर सहकार्य वाढवून सौदी आपल्या धोरणाचे ध्रूवीकरण करणार नाही’, असे प्रिन्स फैझल यांनी स्पष्ट केले.

‘सौदीच्या अर्थव्यवस्थेने वेग धरला असून आम्हाला सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्याचबरोबर सौदी सर्व देशांबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी मोकळा आहे’, असे सौदीचे परराष्ट्रमंत्री म्हणाले. चीन व सौदीतील हे सहकार्य आजचे नसून 2004 सालापासून सुरू असल्याचा दावा प्रिन्स फैझल यांनी केला. सौदीकडून हा खुलासा आलेला असला, तरी यावेळी सौदी अरेबियाच्या चीनबरोबरील सहकार्याकडे अमेरिकेला आव्हान म्हणूनच पाहिले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका व सौदीमधील दुरावा वाढत चालला असून अमेरिकन माध्यमांनी यावर बोट ठेवून सौदी व चीनच्या सहकार्याच्या बातम्या दिल्या आहेत.

leave a reply