मुल्ला बरादर आणि हक्कानी नेटवर्कमधील सत्तासंघर्षामुळे तालिबानमध्ये फूट पडली

लंडन/काबुल – सरकारस्थापनेवरून तालिबानमध्ये फूट पडल्याचे आता जगजाहीर झाले आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी गट हक्कानी नेटवर्कचे वर्चस्व असलेल्या अफगाणिस्तानच्या प्रस्तावित सरकारपासून मुल्ला बरादर याने फारकत घेतली. यामुळेच गेल्या काही दिवसांपासून मुल्ला बरादर व त्याचे समर्थक तालिबानपासून दूर असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था करीत आहेत. सरकारस्थापनेच्याही आधी तालिबानमध्ये पडलेली ही फूट तालिबानसमोरील सर्वात मोठे आव्हान ठरत असून यामुळे अफगाणिस्तानात आता तालिबानच्याच दोन गटांमध्ये घनघोर संघर्ष पेटण्याची दाट शक्यता असल्याचे दिसते.

गेल्या आठवड्यात सरकारस्थापनेची घोषणा केल्यापासूनच तालिबानमध्ये फूट पडल्याच्या बातम्या येऊ लागल्या. राजधानी काबुलमधील राष्ट्राध्यक्षीय निवासस्थानात मुल्ला अब्दुल गनी बरादर आणि हक्कानी नेटवर्कच्या खलिल उर-रहमान हक्कानी यांच्यात हाणामारी झाली. यात बरादर गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यातच गेल्या दहा दिवसांमध्ये काबुलमधील वेगवेगळ्या बैठकांमध्ये मुल्ला बरादर आणि त्याच्या निकटवर्तीयांची अनुपस्थिती नजरेत भरणारी होती.

कतारच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबरच्या बैठीकतही हक्कानी नेटवर्कचे सर्व कमांडर्स हजर होते पण त्यात बरादरचा समावेश नव्हता. त्यामुळे तो मारला गेल्याच्या दाव्यांना अधिकच बळ मिळाले. पण दोन दिवसांपूर्वी तालिबानने बरादरचा ऑडिओ प्रसिद्ध करून तालिबानचा सहसंस्थापक आणि दुसर्‍या क्रमांकाचा नेता जिवंत असल्याचे जाहीर केले. तसेच आपल्यात कुठल्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे तालिबानच्या प्रवक्त्यांनी म्हटले होते. पण गेल्या आठवड्यातील सरकारस्थापनेवरुन मुल्ला बरादर आणि खलिल हक्कानी यांच्यात टोकाचा वाद पेटल्याचे आता स्पष्टपणे समोर येत आहे.

राष्ट्राध्यक्षीय निवासस्थानातच बरादर आणि खलिल यांच्यात हा वाद सुरू असताना, जवळच त्यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष पेटला होता, असे तालिबानच्याच सूत्राने म्हटले आहे. या संघर्षानंतर संतापलेला मुल्ला बरादर आपले सहकारी व समर्थकांसह काबुल सोडून कंदहारमध्ये निघून गेला. गेला आठवडाभर बरादर कंदहारमध्येच असून त्याने काबुलशी संपर्क तोडला आहे. त्याचबरोबर बरादर याने तालिबानच्या बैठकींवर बहिष्कार टाकल्याचा दावा केला जातो.

या सरकारस्थापनेशी फारकत घेतलेल्या बरादर याने अमेरिकेशी संपर्क साधल्याचेही बोलले जाते. अफगाणिस्तानातील प्रस्तावित सरकार दोहा कराराचे पालन करणारे नसल्याचा आरोप बरादर याने केल्याचे काही माध्यमांचे म्हणणे आहे. गेली काही वर्षे मुल्ला बरादर हा दोहा येथील वाटाघाटींमध्ये तालिबानचे नेतृत्व करीत होता व तो अमेरिकन नेत्यांच्या संपर्कातही होता. त्यामुळे बरादरच्या गटाने तालिबानपासून घेतलेली ही फारकत लक्षवेधी ठरते.

कंदहार प्रांत तालिबानचे जन्मस्थान व सत्ताकेंद्र मानले जाते. या प्रांतावर तालिबानचा मुख्य संस्थापक मुल्ला ओमरचा मुलगा मुल्ला याकूब याच्या गटाचे वर्चस्व आहे. बरादर आणि याकूब यांच्यात उत्तम संबंध असल्याचे बोलले जाते. तर याकूब व हक्कानी नेटवर्क यांच्यात वैर असल्याचा दावा अमेरिकी अभ्यासगटाने याआधी केला होता. या दोन गटांमधील वैर अफगाणिस्तानला नव्या गृहयुद्धाकडे नेईल, असे अमेरिकी अभ्यासगटाने बजावले होते. अशा परिस्थितीत, बरादर आणि हक्कानी नेटवर्कमधील सत्तासंघर्षामुळे तालिबानच्याच दोन किंवा त्याहून अधिक गटांमध्ये भीषण संघर्ष पेटण्याची शक्यता बळावली आहे.

leave a reply