इराणच्या लष्करी तळाजवळ शक्तिशाली स्फोट

तेहरान – इराणची राजधानी तेहरानजवळ गुरुवारी रात्री शक्तिशाली स्फोट झाला. पारचीन येथील लष्करी तळाजवळ एका गॅस टँकमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती इराणी माध्यमे देत आहेत. इराणचे सरकार आणि लष्कराने या स्फोटामागील कारण उघड केलेले नाही. त्यामुळे या घटनेकडे अधिक संशयाने पाहिले जात आहे. या स्फोटानंतर पारचीनसह राजधानी तेहरानमध्ये काही काळ कमालीचा तणाव निर्माण झाला होता.

शक्तिशाली स्फोट

इराणचे लष्करी तळ आणि अणुचाचणीचे केंद्र असलेल्या पारचीन शहरात गुरुवारी मध्यरात्री मोठा स्फोट झाला. या स्फोटाचे हादरे बोमेन पारदीस या शेजारच्या शहरातही जाणवले. या स्फोटानंतर सदर भागात नारंगी रंगाचा प्रकाश पसरल्याचे फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. या स्फोटात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती इराणच्या लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल दाऊद अब्दी यांनी दिली. पण या स्फोटामागील कारणाबाबत कोणतीही माहिती देण्याचे ब्रिगेडियर जनरल अब्दी यांनी टाळले.

शक्तिशाली स्फोट

पारचीन येथील लष्करी तळाजवळ एका गॅस टँकचा स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे इराणच्या लष्कराचे म्हणणे आहे. पण या गॅस टँकचा अचानक स्फोट कसा झाला, याचे समाधानकारक उत्तर इराणच्या लष्कराकडे नाही. साधारण दोन दशकांपूर्वी पारचीन येथील लष्करी तळावर जवळच इराणने अण्वस्त्रनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या स्फोटकांची चाचणी घेऊन खळबळ उडवून दिली होती. इराणच्या राजवटीने पाश्चिमात्य माध्यमांचा हा दावा फेटाळला होता. पण त्यावेळीही पारचीन येथील स्फोटामागचे नेमके कारण इराणच्या राजवटीकडे नव्हते. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्री झालेल्या या स्फोटाकडे अधिक संशयाने पाहिले जात आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून इराणच्या लष्करी हालचाली वाढल्या आहेत. साधारण आठवड्याभरापूर्वी इराणच्या लष्कराने पर्शियन आखातात अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेचे डमी जहाज तैनात करून त्यावर क्षेपणास्त्राच्या हल्ल्याचा सराव केला होता. पर्शियन आखातात गस्त घालणाऱ्या अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकांसाठी इराणने दिलेला हा इशारा होता. याव्यतिरिक्त पर्शियन आखातात इराणच्या तटरक्षक दलाच्या जहाजांचा सर्वात मोठा सरावही पार पडला होता. तर या महिन्यातच इराणच्या लष्कराने राजधानी तेहरांमध्ये आपल्या शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन केले होते.

leave a reply