देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४ लाख ९० हजारांजवळ

नवी दिल्ली/मुंबई – गुरुवारच्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासात देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सुमारे १७ हजाराने वाढली होती. रात्री राज्यांकडून जाहीर झालेली नव्या रुग्णांसदर्भातील माहिती पाहता सलग दुसऱ्या दिवशी १६ हजारांहून अधिक नवे रुग्ण देशभरात नोंदविले गेल्याचे स्पष्ट होते.

महाराष्ट्रातच गुरुवारच्या एका दिवसात १९२ जणांचा बळी गेला असून ४,८८१ रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीत ६४ जणांचा एका दिवसात बळी गेला, तर ३,३९० नव्या रुग्णांची नोंद झाली. तसेच तामिळनाडूत ४५ जणांचा बळी गेला असून ३५०९ नवे रुग्ण आढळले आहेत. या तीन राज्यातच एका दिवसात ३०५ जणांचा बळी गेला असून ११,७८० नवे रुग्ण नोंदविण्यात आले आहे.

देशात महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू या राज्यांबरोबर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, जम्मू काश्मीर आदी राज्यांमध्ये नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले आहेत. जवळ जवळ सर्व राज्यात चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत आणि चाचण्या ज्या प्रमाणात वाढत आहेत, तसे नव्या रुग्णांची नोंदही वाढली आहे. देशात बुधवारी सुमारे २ लाख कोरोना चाचण्या झाल्या होत्या, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

चोवीस तासात नव्या रुग्णांचा उच्चांक नोंदविल्यावर देशातील कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या गुरुवारी सकाळी ४ लाख ७३ हजारांजवळ पोहोचली होती. तर रात्री पर्यंत ही रुग्ण संख्या ४ लाख ९० हजारांजवळ पोहोचल्याचे स्पष्ट झाले. देशात कोरोनामुळे दगावणाऱ्यांची संख्या १५ हजारांच्या पुढे गेली आहे. सलग सहाव्या दिवशी देशात १४ हजाराहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले.

दरम्यान या साथीचे रुग्ण बरे होण्याचा दर ५७.४३ टक्क्यांवर पोहोचला असून एका दिवसात १३ हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले. ही दिलासादायक बाब समोर येत आहे.

leave a reply