भारताच्या ‘माऊंटन स्ट्राईक कॉर्प्स’साठी स्वतंत्र ‘आर्टिलरी ब्रिगेड’ची तयारी

नवी दिल्ली – डोंगराळ व दुर्गम क्षेत्रातील युद्धासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आलेल्या ‘माऊंटन स्ट्राईक कॉर्प्स’साठी स्वतंत्र ‘आर्टिलरी ब्रिगेड’ उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. लडाखच्या ‘एलएसी’वर चीनबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर या हालचाली महत्त्वाच्या मानल्या जातात. भारताने गेल्या वर्षी झालेल्या ‘हिमविजय’ सरावात ‘माऊंटन स्ट्राईक कॉर्प्स’ कार्यरत झाल्याचे जाहीर केले होते.

गेल्या काही वर्षांपासून चीन भारताच्या सीमेवर सातत्याने कुरापती काढण्याचा प्रयत्न करीत आहे. चीनच्या या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने आपली संरक्षणसिद्धता वाढविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी आक्रमक पावले उचलण्यात येत आहेत. ‘माऊंटन स्ट्राईक कॉर्प्स’ची उभारणी त्याचाच भाग असून चीन व पाकिस्तान या दोन्ही शत्रूंचा मुकाबला करण्यासाठी त्याची सज्जत वाढविण्यात येत आहे. सध्या ‘माऊंटन स्ट्राईक कॉर्प्स’मध्ये एकच डिव्हिजन कार्यरत आहे. या डिव्हिजनमध्ये एक ‘आर्टिलरी ब्रिगेड’ असली तरी ‘माऊंटन स्ट्राईक कॉर्प्स’ची स्वतंत्र ‘आर्टिलरी ब्रिगेड’ नाही.

त्यामुळे गेल्या काही दिवसात ‘माऊंटन स्ट्राईक कॉर्प्स’साठी स्वतंत्र ‘आर्टिलरी ब्रिगेड’ तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या ब्रिगेडमध्ये ‘अल्ट्रा लाईट हॉवित्झर्स’सह इतर तोफांचा समावेश असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. डोंगराळ भागात शत्रूला प्रत्युत्तर देण्यासाठी ‘आर्टिलरी ब्रिगेड’ अर्थात अत्याधुनिक तोफांद्वारे मारा करणारे पथक सर्वात महत्त्वाचे ठरते, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे ‘माऊंटन स्ट्राईक कॉर्प्स’ची स्वतंत्र ब्रिगेड करण्यासाठी वेग देण्यात येईल, असेही सांगण्यात येत आहे. सध्या ‘माऊंटन स्ट्राईक कॉर्प्स’मध्ये ‘इंटिग्रेटेड बॅॅटल ग्रुप्स’ तयार करण्याचेही प्रयत्न चालू आहेत.

दरम्यान, फ्रान्सच्या ‘सॅफ्रान’ कंपनीने ‘रफायल’ लढाऊ विमानांसाठी प्रगत हॅमर मिसाईलची चाचणी यशस्वी झाल्याची माहिती उघड केली. हे क्षेपणास्त्र ‘बंकर बस्टर’ म्हणून ओळखण्यात येते.

भारताने यापूर्वी ‘रफायल’ लढाऊ विमानांसाठी ‘मीटिऑर मिसाईल्स’ तसेच इस्रायलकडून ‘स्पाईस बॉम्ब्स’ची खरेदी केली आहे. प्रगत ‘हॅमर मिसाईल्स’मुळे रफायल लढाऊ विमानांची मारकक्षमता प्रचंड प्रमाणात वाढेल, असे सांगण्यात येते. क्षेपणास्त्र व ‘ग्लाईड बॉम्ब’ अशा दोन्ही स्वरुपात लक्ष्य भेदणाऱ्या ‘हॅमर मिसाईल’च्या प्रगत आवृत्तीचे वजन एक हजार किलो इतके आहे. 2022 सालापर्यंत हे क्षेपणास्त्र ‘रफायल’वरील तैनातीसाठी पूर्ण सज्ज असेल, अशी माहिती फ्रेंच कंपनीने दिली आहे.

leave a reply