लडाखच्या एलएसीवरील तणाव चीनच्या हिताचा नाही

- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

नवी दिल्ली – ‘लडाखच्या एलएसीवरील परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे. गेले सात महिने भारताची कसोटी पाहणारे ठरले. पण भारत आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला मिळत असलेल्या आव्हानांवर मात केल्याखेरीज राहणार नाही’, असा आत्मविश्‍वास परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केला. एलएसीवरील संघर्षामुळे चीनने भारतात निर्माण केलेली पत गमावण्याचा धोका असून इथला तणाव चीनच्या हिताचा नाही, असा इशारा परराष्ट्रमंत्र्यांनी दिला. तसेच एलएसीवरील हा वाद इतक्या सुटण्याची शक्यता नसल्याचे संकेत परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिले.

‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’च्या (फिक्की) बैठकीला संबोधित करताना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी आणखी एकवार चीनला इशारा दिला. लडाखच्या पूर्वेकडील एलएसीवरील घटना अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या आहेत, असे सांगून जयशंकर यांनी भारताने चीनच्या कारवाया गांभीर्याने घेतल्याचे स्पष्ट केले. चीन भारताबरोबर सीमेसंदर्भात केलेले करार पाळण्यास तयार नाही, त्यामुळे ही स्थिती उद्भवली. ही स्थिती अशीच राहिली आणि चीनने माघार घेण्यास नकार दिला, तर इथला तणाव अधिकच चिघळू शकतो, याचीही जाणीव परराष्ट्रमंत्र्यांनी करून दिली.

62 साली बेसावध भारतावर हल्ला चढवून विश्‍वासघात करणाऱ्या चीनला भारतामधील आपली प्रतिमा सुधारण्यासाठी काही दशकांपर्यंत प्रयत्न करावे लागले होते. थेट उल्लेख न करता याची आठवण करून देऊन जयशंकर यांनी चीनने या काळात जी काही पत कमावली होती, ती गमावण्याचा धोका निर्माण झाल्याचा इशारा दिला. ‘माझ्या बालपणापासून चीनबाबतच्या भारतीयांच्या भूमिकेत होत असलेले बदल मी अनुभवलेले आहेत’, असे सांगून जयशंकर यांनी चीनने पुन्हा भारतीयांचा विश्‍वास गमावलेला आहे, असे संकेत दिले.

एलएसीवर निर्माण झालेली परिस्थिती चीनच्या हिताची नाही. भारतीयांमध्ये चीनच्या विरोधात संताप उसळलेला आहे. यामुळे उभय देशांच्या संबंधांवर परिणाम झाल्याखेरीज राहणार नाही, अशी स्पष्टोक्ती परराष्ट्रमंत्र्यांनी केली आहे. गेल्या सात महिन्यांचा काळ भारताची कसोटी घेणारा ठरला. मात्र राष्ट्रीय सुरक्षेला मिळत असलेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी आपण भारतीय खडे ठाकलो आहोत आणि या आव्हानावर आपण नक्कीच मात करू, असा विश्‍वास परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी व्यक्त केला. चीनबरोबरील तणाव कमी करण्यासाठी गंभीर चर्चा सुरू आहे खरी. पण हा तणाव नक्की कधी निवळेल, ते आत्ताच सांगता येणार नाही, असेही जयशंकर पुढे म्हणाले. यासंदर्भात आपल्याला अंदाज वर्तवायचा नाही, असे सांगून परराष्ट्रमंत्र्यांनी इतक्या लवकर ही समस्या सुटण्याची शक्यता दृष्टीपथात नसल्याचे संकेत दिले. भारतीय नेते सातत्याने एलएसीवरील बेजबाबदार कारवायांचे चीनला मोठे परिणाम सहन करावे लागतील, असे बजावत आहेत. लडाखच्या एलएसीवर हजारो जवान व अत्याधुनिक शस्त्रास्त्रे तैनात ठेवून भारताबरोबरील व्यापारी संबंध सुरळीत राहतील, या भ्रमात चीनने राहता कामा नये, असा स्पष्ट संदेश भारताकडून दिला जात आहे. त्यानंतरही चीनने आपला हटवादीपणा सोडून दिलेला नसून चीन भारतावर लष्करी दडपण वाढविण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करीत असल्याचे दिसत आहे.

यामुळे भारताच्या टीकेची धार अधिकाधिक तीव्र होऊ लागली आहे. यानंतरही चीनने एलएसीवरून माघार घेतली नाही, तर या देशाला त्याची जबर किंमत चुकती करावी लागेल, असे इशारे भारताकडून दिले जात आहेत. मात्र लडाखच्या पूर्वेकडील तैनाती हा आता चीनच्या प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. इथून भारताने माघार घ्यावी, अशी अपेक्षा चीन व्यक्त करीत आहे. पण यावेळी भारत चीनवर विश्‍वास ठेवायला तयार नाही. चीनला भारताचा घात करण्याची आणखी एक संधी देऊ नका, असे माजी लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचवेळी आपले लष्कर भारतापेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे, हा चीनचा भ्रम दूर करण्याचा अवसर चालून आलेला आहे, त्याचा पुरेपूर वापर करायलाच हवा, असेही हे माजी लष्करी अधिकारी सुचवित आहेत.

leave a reply