आशियाई देशांना कोरोनाच्या लसी पुरवून क्वाडद्वारे चीनला काटशह देण्याची तयारी

वॉशिंग्टन – कोरोना प्रतिबंधक लस म्हणजे आजच्या काळातील ‘नवे राजनैतिक चलन’ बनल्याचा दावा केला जातो. ज्या देशांकडे हे चलन आहे, ते देश याचा आपल्या परराष्ट्र धोरणासाठी याचा वापर करीत असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच भारत यात सर्वात पुढे असल्याचे दावे केले जातात. भारताने या लसी विकसित करून चीनला जबरदस्त हादरा दिला आहे आणि यामुळे चीन कमालीचा अस्वस्थ बनल्याचेही बोलले जाते. पण आता चीनने सुमारे ४५ देशांना कोरोनाची लस पुरविण्याची तयारी केली आहे. याद्वारे चीनसारखा अतिमहत्त्वाकांक्षी देश आपले परराष्ट्र धोरण आक्रमकपणे पुढे रेटू शकतो. ही बाब लक्षात घेऊन अमेरिकेने ‘क्वाड’च्या सहकार्याने कोरोनाची लस आशियाई देशांना पुरवून चीनला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे.

कोरोनाच्या लस पुरविण्याची तयारी दाखवून चीनने आशियाई क्षेत्रातील छोट्या देशांना आपल्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटीव्ह-बीआरआय’ प्रकल्पात सहभागी होण्याची अट टाकली होती. कोरोनाच्या साथीमुळे हवालदिल बनलेल्या या देशांसमोर आपल्या प्रकल्पात सहभागी होण्यावाचून दुसरा पर्यायच नसेल, असा चीनचा तर्क होता. पण चीनच्याही आधी भारतात कोरोना प्रतिबंधक लसी विकसित झाल्या. या लसींची विश्‍वासार्हता व प्रभाव चीनच्या लसीपेक्षा खूपच अधिक आहे. इतकेच नाही तर त्याचे दर देखील चीनपेक्षा माफक आहेत. त्यामुळे या आघाडीवरील चीनचा कट अपयशी ठरू लागल्याचे दिसत आहे.

तरीही चीनने कोरोनाच्या साथीचा लाभ घेऊन आपली लस छोट्या व गरीब देशांना पुरविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. यानुसार चीन सुमारे ४५ देशांना कोरोनाची लस पुरविणार आहे. या देशांना सुमारे ५० कोटी डोस पुरविण्यासाठी चीनने सुरू केलेले प्रयत्न अमेरिकेच्या बायडेन प्रशासनालाही दखल घेण्यास भाग पाडत आहेत. चीन आपले हेतू साध्य करण्यासाठी या लसीचा वापर करील, हे लक्षात घेऊन बायडेन प्रशासनाने त्याविरोधात पावले उचलल्याचे दावे केले जातात. यासाठी ‘क्वाड’ देशांचा वापर करण्याचा निर्णय बायडेन प्रशासनाने घेतल्याची माहिती समोर आली आहे.

२००४ साली भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया या देशांनी मिळून ‘क्वाड’ची उभारणी केली होती. २००४ साली इंडोनेशियावर त्सुनामीचे संकट कोसळल्यानंतर क्वाड देशांनी जलदगतीने बचावकार्य सुरू केले. कोरोनाची साथ वाढत असताना, क्वाड अशारितीने सहकार्य करून छोट्या आशियाई देशांना सहाय्य करू शकेल, असे व्हाईट हाऊसच्या ‘इंडो-पॅसिफिक’ धोरणाचे समन्वयक ‘कर्ट कॅम्बेल’ यांनी म्हटले आहे. तर ‘ब्रुकिंग्ज् इन्स्टिट्यूशन’ या ख्यातनाम अभ्यासगटाच्या भारतविषयक तज्ज्ञ तन्वी मदन यांनी या संदर्भात अधिक सखोल माहिती दिली. ‘‘‘क्वाड’ हे संघटन केवळ चीनला रोखण्यासाठी नाही, हा संदेश कोरोनाची लस पुरवून दिला जाऊ शकतो. यामुळे क्वाडच्या संदर्भात असलेल्या शंका दूर होतील आणि आशियाई देश याच्याशी जोडले जातील’’, असा दावा तन्वी मदन यांनी केला आहे.

leave a reply