चीनने भारतावरील सायबर हल्ल्याचा आरोप नाकारला

नवी दिल्ली/बीजिंग – गेल्या वर्षी मुंबईचा वीजपुरवठा खंडीत करण्यासाठी चीनने सायबर हल्ला घडविल्याचा आरोप होत आहेत. अमेरिकेच्या मॅसॅच्युसेटस् येथील कंपनीने यासंदर्भात दिलेल्या माहितीचा दाखला देऊन अमेरिकेच्या वर्तमानपत्राने सर्वात आधी याची बातमी प्रसिद्ध केली. भारतीय माध्यमांनी ही बातमी उचलून धरल्यानंतर त्यावर चीनची प्रतिक्रिया आली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या देशावरील हा आरोप निराधार असल्याचे सांगून उलट चीन हा सायबर सुरक्षेचा ठाम पुरस्कर्ता देश असल्याचे म्हटले आहे.

गेल्या वर्षापासून चीनमधून भारतावर होणार्‍या सायबर हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषतः लडाखच्या एलएसीवर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झालेला असताना, चीनशी संलग्न असलेल्या हॅकर्सच्या गटाने भारताला सायबर हल्ल्याचे लक्ष्य करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. गेल्या वर्षी १२ ऑक्टोबर रोजी मुंबईचा वीजपुरवठा काही तासांसाठी खंडीत झाला होता. यामागे चीनच्या सरकारशी निगडीत असलेल्या ‘रेडइको’ नावाच्या हॅकर्सच्या गटाचा हात असल्याचा दावा एका अमेरिकन कंपनीने केला. देशांचा इंटरनेट वापर व सायबर सुरक्षेशी निगडीत असलेल्या या कंपनीने केलेल्या दाव्याची बातमी अमेरिकन वर्तमानपत्राने प्रसिद्ध केली.

ही बातमी भारतीय माध्यमांनी उचलून धरली. यानंतर भारतात इतर ठिकाणीही वीजपुरठा खंडीत करण्यासाठी चीनमधून सायबर हल्ले झाल्याच्या बातम्या आल्या. सिंगापूर व टोकिओ येथे केंद्र असलेल्या ‘सायफार्मा’ या सायबर सुरक्षा कंपनीने देखील चीन भारतात तयार होणार्‍या कोरोना प्रतिबंधक लसींची माहिती मिळविण्यासाठी सायबर हल्ले चढवित असल्याचे म्हटले आहे. ‘एटीपी १०’ आणि ‘स्टोन पांडा’ या नावांनी कुख्यात असलेला चिनी हॅकर्सचा गट ‘भारत बायोटेक’ आणि ‘सिरम इन्स्टीट्युट ऑफ इंडिया’वर हे सायबर हल्ले चढवित असल्याचे सायफार्माने बजावले होते. यामुळे चीनच्या सायबर हल्ल्याचा मुद्दा ऐरणीवर आला असून यामुळे देशाच्या सायबर सुरक्षेवर गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या लसींची निर्मिती करणार्‍या कंपन्यांवर झालेल्या सायबर हल्ल्यातून काही निष्पन्न झालेले नाही, असे सांगून केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी देशाला आश्‍वस्त केले. तसेच सायबर क्षेत्रातील भारताची सुरक्षाविषयक भिंत खूपच भक्कम आहे, अशी ग्वाही रविशंकर प्रसाद यांनी दिली. तर गेल्या वर्षी मुंबईचा वीजपुरवठा खंडीत करणारा सायबर हल्ला चीनमधून झाल्याच्या आरोपाला मात्र केंद्र सरकारने अधिकृत पातळीवर दुजोरा दिलेला नाही. तसे पुरावे नसल्याचे केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग म्हणाले. पण या आघाडीवर सावध राहण्याची गरज असल्याचा दावा केंद्रीय ऊर्जामंत्र्यांनी केला.

तर चीनने आपल्यावरील हे आरोप नाकारले आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबिन यांनी सायबर हल्ल्याबाबत चीनवर केले जाणारे आरोप निराधार असून अशारितीने आरोप करणे बेजबाबदारपणाचे ठरते, अशी टीका केली. सायबर हल्ल्यांचे मूळ शोधून काढणे अतिशय अवघड असते. त्यामुळे पुरावे असल्याखेरीज अशा स्वरुपाचे आरोपामागे बेजाबदारपणाबरोबरच कुटील हेतू असू शकतात, असा ठपका वेनबिन यांनी ठेवला आहे.

दरम्यान, चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने भारतीय माध्यमांवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. भारतीय माध्यमे चीनला अकारण लक्ष्य करीत आहेत. यामुळे भारताच्या चीनबरोबरील संबंधांवर विपरित परिणाम होत असल्याचा दावा या दैनिकाने केला. इतकेच नाही तर भारतीय माध्यमांच्या आक्रमक राष्ट्रवादाचा प्रभाव भारताच्या धोरणावर पडू लागला असून भारतीय नेत्यांना चीनविरोधी भूमिका स्वीकारण्यावाचून पर्याय राहिलेला नाही, असे ‘ग्लोबल टाईम्स’ने म्हटले आहे.

leave a reply