राष्ट्राध्यक्ष बायडेन व कुटुंबियांच्या व्यवहाराची चौकशी करणार

प्रतिनिधीगृहातील रिपब्लिकन सदस्यांचा इशारा

President Bidenवॉशिंग्टन – अमेरिकेतील संसदेच्या प्रतिनिधीगृहावर ताबा मिळविण्यात यशस्वी झालेल्या रिपब्लिकन पार्टीने राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याचा इशारा दिला आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते तसेच संसद सदस्य जेम्स कॉमर व जिम जॉर्डन यांनी याची माहिती दिली. राष्ट्राध्यक्ष बायडेन व त्यांचा मुलगा हंटर बायडेन यांचे परदेशी भागीदार तसेच करारांशी असलेल्या संबंधांची संसदीय समितीकडून चौकशी केली जाईल, असे संसद सदस्य कॉमर यांनी बजावले. रिपब्लिकन नेत्यांच्या या इशाऱ्यावर व्हाईट हाऊसने प्रतिक्रिया दिली असून, बायडेन यांच्यासंदर्भातील दावे ‘कॉन्स्पिरसी थिअरीं’चा भाग असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेत झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टीने प्रतिनिधीगृहाच्या २१८ जागा जिंकून बहुमत मिळविले आहे. बहुमत मिळविल्यानंतर महागाई, वाढती गुन्हेगारी व अमेरिकी सीमांची सुरक्षा या मुद्यांवरून बायडेन प्रशासनाची कोंडी करण्यात येईल, असे रिपब्लिकन पार्टीचे नेते केव्हिन मॅकार्थी यांनी जाहीर केले होते. त्यापाठोपाठ आता रिपब्लिकन नेत्यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन व त्यांचा मुलगा हंटर बायडेन याला लक्ष्य करण्याचे संकेत दिले आहेत.

james comerमार्च महिन्यात रिपब्लिकन पार्टीचे संसद सदस्य मॅट गेट्झ यांनी, हंटर बायडेन यांच्या लॅपटॉपमधील माहितीचे पुरावे संसदेत सादर केले होते. ज्यो बायडेन अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष असताना त्यांचा मुलगा हंटर बायडेन याने विविध कंपन्या स्थापन करून परदेशी कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. यात प्रामुख्याने चिनी कंपन्यांचा समावेश होता. गुंतवणुकीच्या बदल्यात बायडेन यांनी चीनच्या कलाने अनेक निर्णय घेतले होते. बायडेन, त्यांचा मुलगा हंटर व इतर परिवाराला मोठा आर्थिक लाभ मिळाल्याचेही समोर आले होते. २०१८ साली डेलावेअर प्रांतातील सरकारी वकिलांनी याची चौकशीही सुरू केली होती. हंटर बायडेन यांची युक्रेनमध्ये अवैध गुंतवणूक असल्याचे दावेही माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते.

मात्र कालांतराने ‘एफबीआय’सह अमेरिकेतील इतर यंत्रणांनी बायडेन यांचा लॅपटॉप व त्यांच्याबाबत उघड होणारी माहिती रशियन कटाचा भाग असून चौकशी बंद केली होती. पण काही दिवसांपूर्वीच एका अज्ञात व्यक्तीने आपल्याला हंटर बायडेन व त्याच्या व्यवहारांसंदर्भात माहिती असून आपण ती यंत्रणांना देण्यास तयार असल्याचे वृत्त समोर आले होते. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

leave a reply