अमेरिकेत इंधन दरवाढीचा भडका उडाला असताना राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडून इंधन उत्खननावर बंदीचा निर्णय

वॉशिंग्टन – अमेरिकेतील इंधनाचे दर विक्रमी स्तरावर पोहोचले असतानाच देशाच्या इंधन उत्पादनात वाढ करणाऱ्या प्रकल्पांवर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी बंदी जाहीर केली. अलास्का व ‘गल्फ ऑफ मेक्सिको’मधील इंधन उत्खननाची तीन कंत्राटे रद्द करण्यात आली आहेत. बायडेन यांच्या या निर्णयावर ‘अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूट’ने तीव्र नाराजी दर्शविली आहे. बायडेन प्रशासन एकीकडे इंधनाचा पुरवठा वाढविण्याची मागणी करीत असताना, दुसऱ्या बाजूला पुरवठा कमी करणारे निर्णय घेत आहेत, असा आरोप ‘अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूट’ने केला. अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षानेही बायडेन यांच्या निर्णयावर टीकेची झोड उठवली आहे.

युक्रेन युद्धावरून रशियन अर्थव्यवस्थेचा कणा मोडणारे निर्बंध लादल्याची भाषा करणाऱ्या पाश्चिमात्य देशांमध्ये महागाईचा जबरदस्त भडका उडाला आहे. यात अमेरिका आघाडीवर असून देशातील महागाई निर्देशांक आठ टक्क्यांवर पोहोचला आहे. या वाढत्या महागाईमागे इंधनाच्या दरांमध्ये झालेली वाढ हे प्रमुख कारण मानले जाते. युक्रेन युद्धावरून रशियावर निर्बंध लादून आपली पाठ थोपटून घेणाऱ्या राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी, वाढत्या महागाईबाबत आपण काही करू शकत नसून त्याचे सर्व खापर रशियावर फोडले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून महागाई निर्देशांकात एकदाही घट झालेली नाही. नोव्हेंबर 2020 पासून सलग 14 महिने अमेरिकेतील महागाईत सातत्याने भर पडत आहे. अमेरिकेतील इंधनाचे दर प्रति गॅलनमागे चार डॉलर्सवर पोहोचले आहेत. दर आठवड्याला दरांमध्ये भर पडत असताना बायडेन यांनी रशियन इंधनाची आयात बंद करून आपण रशियाला धक्का दिल्याचे दावे करण्यात व्यस्त आहेत. दुसऱ्या बाजूला ओपेक व इतर देशांकडून इंधनाची आयात वाढविण्याचे प्रयत्नही अपयशी ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेतील स्थानिक इंधन उत्पादनात भर टाकतील अशा प्रकल्पांवर बायडेन यांनी बंदी टाकली आहे. यात अलास्का राज्यातील ‘कुक इनलेट’ या भागातील इंधन उत्खनन व ‘गल्फ ऑफ मेक्सिको’मधील दोन ‘ऑफशोअर फिल्ड्स’चा समावेश आहे.

अमेरिकेला इंधनाची टंचाई भासत असतामा हे प्रकल्प रद्द करणे दुटप्पीपणाचे धोरण असल्याची टीका रिपब्लिकन पक्ष तसेच इंधनकंपन्यांच्या गटाने केली आहे. ‘अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूट’चे प्रमुख फ्रँक यांनी बायडेन प्रशासनाने ‘ऑफशोअर ड्रिलिंग’साठी पाच वर्षांच्या योजनेवर तात्काळ निर्णय घ्यायला हवा, अशी मागणीही केली आहे.

बायडेन प्रशासनाच्या नव्या निर्णयातून बेजबाबदारपणा व मूर्खपणा दिसून येतो, अशी घणाघाती टीका रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या निर्णयामुळे अमेरिकी जनतेला मोठा फटका बसू शकतो, असा आरोपही रिपब्लिकन पक्षाकडून करण्यात आला आहे.

leave a reply